BJP Chandrakant Patil : एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची धग पुन्हा वाढली आहे. कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही, असं म्हणत सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं. या आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादी भाजपसोबत सलगी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितलं. 


राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सांगलीमध्ये भाजपमध्ये सलगी करत आहेत, या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक राजकारण, दुपारी एक राजकारण आणि संध्याकाळी एक राजकारण. एकवेळ काँग्रेस परवडली. काँग्रेसमधील सर्व व्यक्तीमत्व वेल कल्चर असतात. दरोडेखोर नसतात. राष्ट्रवादीनं सलगी करणं याला राष्ट्रवादी कधीचं भूलणार नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत करत असलेल्या डावाला भाजप फसणार नाही.'


राष्ट्रवादी जवळ येऊ पाहतेय, पण आम्ही त्यांना जवळ येऊ देणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांशी चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीवर निशाणा साधला. 


दरम्यान, प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उपसलं आहे. गुरुवारी बैठकीत तोडगा निघाला असं सांगितलं होतं मात्र अनेक ठिकाणी आजही कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. कृती समिती शासनासोबत डील करतेय, असा आरोप करत आंदोलन पुकारण्यात आलं आहे.  गुरुवारी एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आला, तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली. मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलं होतं. तरीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे.  


आणखी वाचा :


'होय, मी भंगारवाला, माझा सोळाव्या वर्षांपासून भंगारचा धंदा, मला त्याचा अभिमान' : नवाब मलिक 


Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी, पुण्यात स्वस्त तर मुंबईत महागलं