वर्धा: धावती रेल्वे पकडण्याच्या नादात तोल गेला आणि मृत्यूच समोर दिसला, अशा वेळी त्या प्रवाशाच्या मदतीला आरपीएफ जवान देवदूत बनून आला आणि त्याचा जीव वाचवला. वर्धा रेल्वे स्थानकावरील ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मंगेश दुधाने असं त्या देवदूताचं नाव आहे.

  


तो वर्धा रेल्वे स्थानकावर पाणी भरण्यासाठी खाली उतरला, नळावर गर्दी बघून त्याने दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जाऊन पाणी आणण्याचा विचार केला. तो पाणी घेण्यासाठी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेला आणि तेव्हाच रेल्वेने मोठा हॉर्न दिला आणि गाडी प्लॅटफॉर्मववरून सुटू लागली. यात 'त्या' प्रवाशाची मोठी तारांबळ उडाली आणि त्याने कसाबसा  रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र डाव चुकला आणि त्याचा तोल गेला, तो खाली कोसळला आणि रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या स्पेस मध्ये अडकला. बाहेर फक्त त्याचे डोके दिसत होते. नागरिकांनी आरडाओरड सुरू केली आणि एक देवदूत धावून आला, तो म्हणजे अएपीएफ जवान मंगेश दुधाने. त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता जवळजवळ मरणाच्या दारात पोहोचलेल्या प्रवाशाला मोठ्या शिताफीने वाचवले. सीसीटीव्ही कॅमेरात हा थरार कैद झाला. 'तो' नसता तर 'तो प्रवासी' आज जिवंत असणे कठीण होते.


रेल्वे प्लॅटफॉर्मवर नेमकं काय घडलं?
वर्धा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर सकाळी अहमदाबाद-पूरी एक्सप्रेस रेल्वेगाडी आली. या गाडीत वडोदरा ते बालूगाव असा प्रवास करणारा चित्रसेन लीलाधर पात्रा (47) रा. पाटनशाही, बिलासपूर ओडीसा. याला तहान लागली तेव्हा बाटलीत पाणी संपलं होतं. वर्धा स्थानक आल्यावर पाणी भरू हे त्याने ठरवलं. चित्रसेन हा वॉटर बॉटल मध्ये पाणी भरण्यासाठी प्लॅटफॉर्म वर उतरला तेव्हा नळावर नागरिकांची गर्दी असल्याने चित्रसेन पाणी भरण्यासाठी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेला. त्याचवेळी 9.25  मिनिटांनी रेल्वेगाडी निघण्याच्या मार्गावर असून गाडी चालू झाल्याचे त्याला दिसले. त्यामुळे चित्रसेनची मोठी धावपळ झाली आणि त्याने धावत पळत जात समोरील एसी कोचमध्ये धावत्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वेत चढत असताना चित्रसेनचा तोल गेल्याने तो रेल्वेगाडी आणि प्लॅटफॉर्ममधील स्पेसमध्ये पडला. त्यामुळे त्याचे डोके फलाटावर घासत जात होते. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली.


आरपीएफ बनला देवदूत
त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेला आरपीएफचा रक्षक मंगेश दुधाने हा देवदूत बनून आला आणि स्वत:च्या जिवाची पर्वा न करता मोठ्या शिताफीने चित्रसेनचा जीव वाचवून त्याला जणू नवजीवनच दिले. चित्रसेन पात्रा याचे दोन्ही पाय फलाट आणि रेल्वेच्या खाली जात असल्याचे दिसताच आरक्षक मंगेश दुधाने हा देवमाणूस बनून आला आणि ‘व्हॅक्यूम ड्रॉप’ टाकून ट्रेन तत्काळ थांबवून दोन्ही हाताने त्याला बाहेर काढून प्राण वाचवले. त्याला पाणी पाजून धीर देत त्याला सुरक्षितरित्या सीटवरही बसविले. आरपीएफ मंगेश दुधानेच्या कामगिरीबाबत त्याचे कौतुक केल्या जात असून प्रवाशाने त्यांचे आभार मानले.