बीड : परळीत निराधारांचा महामेळावा पार पडला. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मिशन वात्सल्य, संजय गांधी निराधारसह विविध विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना लाभ वितरण आणि संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी या मेळाव्याला आलेल्या महिलांच्या पंगतीत स्वतः धनंजय मुंडे यांनी जेवायला वाढलं. भोजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर यावेळी मंडपातच निराधारांचा जनता दरबार झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. धनंजय मुंडे यांनी स्वतः जमिनीवर बसून यांनी आनाथांचे प्रश्न ऐकून घेतले.
बीडच्या परळीत मिशन वात्सल्य या उपक्रमाअंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धनादेश आणि मदतीचं वाटप करण्यात आलं. या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या निराधारांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या निराधारांना धनंजय मुंडे यांनी वाढपी होऊन भोजन देखील वाढलं. यावेळी महिलांची पूर्ण पंगत होईपर्यंत धनंजय मुंडे हे मंडपामध्ये थांबले होते.
प्रत्येक निराधाराचा मला आधार व्हायचंय : धनंजय मुंडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून मला निराधार, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या यांसारख्या सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांची सेवा करायची संधी मिळाली. विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य, अनुदान याद्वारे या निराधार आणि दुर्बल घटकांचे आयुष्य सुखकर करता यावे, यासारखा दुसरा आनंद कशातच नाही. परळी तालुक्यातील सुमारे 25 हजार लाभार्थी या योजनेतून लाभ मिळवत असून, आणखी जास्तीत जास्त लाभार्थींना लाभ मिळवून देऊन इथल्या प्रत्येक निराधाराचा आधार मला व्हायचं आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं.
विविध विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश, कर्जाचं वाटप
परळीत पहिल्यांदाच मिशन वात्सल्य अंतर्गत कोविडमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या लाभातून दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी पाच लाखांचे धनादेश, एक पालक गमावलेल्या बालकांना प्रतिमाह 1100 रुपये सांगोपन निधी, विधवा झालेल्या महिलांना घरकुल योजनेचा लाभ, यासह विधवा महिलांना नगरपरिषदेच्या माध्यमातून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत इत्यादी योजनांच्या लाभाचं वितरण करण्यात आलं. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतून नवीन लाभ मंजूर झालेल्या महिलांना मंजुरी प्रमाणपत्राचं वाटप, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना एकरकमी 20 हजार रुपयांचा धनादेश वाटप, अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड वाटप, महिला आर्थिक विकास महामंडळाकडून बचत गटांना प्रत्येकी दीड लाख रुपयांच्या कर्जाचं वाटप यासह श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्याचा महामेळावा संपन्न झाला.
एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी विशेष यंत्रणा राबवा, धनंजय मुंडेंचे प्रशासनाला निर्देश
मतदारसंघात विशेष सहाय्य विभागाच्या किंवा आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकांना आधार देणाऱ्या कोणत्याही योजनेतील एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एक मोहीम हाती घेऊन काम करावं, त्यांना कोणतीही अडचण आल्यास मी पाठीशी उभा आहे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला विविध योजनेतील प्रलंबित अर्ज देखील तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.
...आणि धनंजय मुंडे पंगतीत वाढू लागले!
दरम्यान प्रथमच मोठ्या प्रमाणावर आयोजित या निराधार मेळाव्याला हजारो लाभार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती. या महामेळाव्यात आलेल्या सगळ्यासाठी संयोजन समितीने भोजनाची सोय केली होती. कार्यक्रम संपताच महिला मंडळाची पंगत जेवायला बसली, मोठी पंगत जेवायला बसल्याचे पाहून, वाढणात कमतरता होऊ नये म्हणून स्वतः धनंजय मुंडे जेवण वाढायला सरसावले. महिलांच्या पंगतीत कुठे द्रोण, कुठे चपाती तर तिथे वरण वाढताना मंत्री महोदयांना पाहून सारेच जण कुतूहलाने पाहत होते.