Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोण? हा प्रश्न केल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराची वर्णी लागली असून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे. 


राज्यसभेच्या सहाव्या जागी शिवसेनेचाच उमेदवार असणार, हे संजय राऊतांचे उद्गार अखेर खरे ठरले, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची वर्णी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपतींसोबतच चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांच्या नावाची चर्चा होती. 


संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली. त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार हे स्पष्ट झालं होतं. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती मिळत होती. मंगळवारी टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतील असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. त्यामुळे सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीचा हात कुणाच्या डोक्यावर असणार याची उत्सुकता लागली होती. दुसरीकडे शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पाठ फिरवली. त्यामुळे संभाजीराजेंची पुढची भूमिका काय असेल याकडंही लक्ष लागलं आहे. याच अनुषंगाने शिवसेनेच्या एका बड्या नेत्यासोबत मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांची आज बैठक पार पडणार आहे. त्यामुळे संभाजीराजे काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


संधी मिळाली तर आनंदच : संजय पवार 


संभाजीराजेंनी प्रस्ताव नाकारल्यास कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरु होती. यावर बोलताना संधी मिळाली तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती. संजय पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं की, "मला पक्षाकडून अद्याप उमेदवारीबाबत सांगण्यात आलेलं नाही. पण माझ्या नावाची चर्चा असल्याचं मी ऐकतोय. मला संधी मिळाली तर आनंदच आहे. सध्या या चर्चेमधेच मी आनंद मानतोय. संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या घराण्याचा आम्ही आदरच करतो. संभाजीराजे छत्रपती यांनी काय करावं? याबाबत मी त्यांना सूचना करणार नाही. माझ्या नावाची चर्चा ही संभाजीराजेंवर दबाव टाकण्यासाठी नाही."