Wardha News Update : वर्ध्या शहरात धुमाकूळ घालणाऱ्या गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी आता 'अँटी गॅंग सेल' सुरू करण्यात आला आहे. या 'अँटी गँग सेल'च्या माध्यामातून पोलिस धुमाकूळ घालणाऱ्या गँगवर नजर ठेवणार आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत गँगवारमधील जवळपास डझनभर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
वर्ध्यात गेल्या काही दिवसांपासून गँगवार वाढत आहे. शिवाय अंमली पदार्थ आणि बंदुकीचा वापर हे चिंतेचे विषय समोर आहेत. हे आव्हान पेलण्यासाठी पोलिस प्रशासनाने देखील कंबर कसली आहे. गँगला लगाम घालण्यासाठी 'अँटी गँग सेल' निर्माण करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांऱ्यांचा या सेलमध्ये समावेश असणार आहे.
चार दिवसांपूर्वी एका ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. हा थरार प्रत्यक्ष अनुभवणाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. पण चर्चा सुरू झाली वर्ध्यातील गँगवारची. मुंबई, नागपूर सारख्या मोठ्या शहरात ऐकले जाणारे गँगवार सारखे शब्द वर्ध्याच्या नगरीत रोज ऐकायला मिळत आहेत. त्यामुळेच वर्ध्यात निर्माण झालेल्या या 'गँग'च्या मुसक्या आवळण्याचा चंग वर्धा पोलिसांनी बांधलाय.
वर्ध्याच्या स्टेशन परिसरात 28 फेब्रुवारीच्या रात्री गुन्हेगारांच्या दोन गँगमध्ये राडा झाला होता. यावेळी तलवारी आणि कोयत्याने मारामारी झाली. याचवेळी हवेत गोळीबार देखील झाला. आमचीच गँग श्रेष्ठ म्हणत या दोन्ही गँगमध्ये वाद झाला होता.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. दोन्ही गँगच्या 14 जणांना पोलिसांनी विविध ठिकाणावरून ताब्यात घेतले. यात एका गँगमधील सहा तर दुसऱ्या गँगमधील आठ जणांचा समावेश आहे. याबरोबरच दोन बुलेटसह एक पिस्तुल, एक तलवार आणि एक कोयता जप्त करण्यात आला आहे. शिवाय अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आदिल शेख, शोएब पठाण, गौरव विरखडे, छोटू उपाध्याय, संजय जयस्वाल अशी एका गटातील गुन्हेगारांची नावं आहेत. राकेश पांडे, राहुल मडावी, विकास पांडे, गणेश पेंदोर, दादू भगत, रितीक तोडसाम, राहुल मडावी आणि समीर दलगरम अशी दुसऱ्या गटातील संशयितांची नावे आहेत. या घटनेत अजिंक्य उर्फ अज्जू बोरकर हा गंभीर जखमी झाला असून त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या