वर्धा : वर्ध्यात व्याजाचे दोन हजार रुपये दिले नाहीत म्हणून एका व्यक्तीला कारनं चिरडल्याची घटना घडली आहे. वर्ध्याच्या नागसेननगर येथील ही कालची घटना असून यात शंभू सोनगडे यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली.
नागसेननगर येथील शंभू सोनगडे यांची पत्नी जयमाला शंभू सोनगडे यांनी पाच हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील तीन हजार रुपयांचा परतावा देखील केला होता. या रकमेतील दोन हजार रुपये परत द्यायचे होते. त्याकरता 2 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शैलेश येळणे रा. गजानननगर हा सोनगडे यांच्या घरी गेला. त्यावेळी शैलेश येळणे याने उर्वरित रकमेची मागणी केली. मात्र पैसे नसल्याने लवकरच परतावा करेल, असे सांगितले. त्यावरून येळणे याने सोनगडे यांच्याशी वाद घातला. दरम्यान, उपस्थितांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
वादानंतर शैलेश येळणे घराबाहेर आला आणि गाडीत बसला. दरम्यान, बाहेर गेल्यानंतर शैलेश येळणेने कार सुरू करत बाहेर आलेल्या शंभू सोनगडे यांच्या अंगावर नेली. त्यात गाडीने शंभू सोनगडे यांना फरफटत नेले. घटना दिसताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेत गंभीर जखमी शंभू सोनगडे यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या दोन हजार रुपयांसाठी घडलेल्या घटनेनं सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या :