Wardha Lok Sabha Election 2024: सध्या देशासह राज्यात निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वारे वाहत आहे. दरम्यान, या कालावधीमध्ये अनेक राजकीय पक्षातील उमेदवार अनेक प्रकारचे आश्वासन आणि आमिष दाखवत मतदारांचे मत आपल्या पारड्यात पाडून घेण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतात. असाच एक अफलातून प्रयत्न  वर्ध्यातील (Wardha Lok Sabha) एका उमेदवाराकडून होताना दिसतोय. वर्ध्यात दारुबंदी असताना ही दारूबंदी उठवून सर्वांना समान न्याय देऊ. अशा आशयाचा वचननामा एका उमेदवाराने जाहीर केला आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्रात दारूबंदी नाही, तर वर्ध्यातील चार विधानसभा क्षेत्रांत दारुबंदी आहे. त्यामुळे एकाच लोकसभा क्षेत्रात जनतेला वेगळा न्याय कसा? याकडे देखील या जाहीरनाम्यामधून लक्ष वेधले गेले आहे.  


एकाच लोकसभा क्षेत्रात वेगळा न्याय कसा?


वर्धा जिल्हा तसा शासनाने दारूबंदी असलेला जिल्हा घोषित केला आहे. पण याच वर्धा जिल्ह्यात छुप्या मार्गाने दारूची सर्वाधिक विक्री होत असल्याचे बोलल्या जातं. एकीकडे अवैध पद्धतीने दारूची विक्री तर होतेच शिवाय, त्यात नकली दारू देखील जोरात विकल्या जात असल्याची चर्चा आहे. मग अशात कायदेशीर परवानगीने दारू वर्ध्यात का विकली जाऊ नये? दारू विक्रीतून मिळणार महसूल उगाच का बुडतोय? शासनाच्या फायद्याची हीच गोष्ट लोकसभा निवडणुकीत एका उमेदवाराच्या जाहीरनाम्यात लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.


वर्ध्यात विदर्भवादी आशिष इझनकर यांनी विदर्भ राज्य आघाडीकडून आपली उमेदवारी दाखल केलीय. आपण जनतेसाठी काय करणार? याचा लेखाजोखा मांडणारा अजेंडा त्यांनी एका पत्रकातून जनतेसमोर मांडलाय. या पत्रकातील तेरावा मुद्दा मात्र साऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरत आहे. हा मुद्दा आहे वर्ध्यातील दारूबंदी हटविण्याचा. दारूबंदी हटवून दारू सुरू करण्यात येईल, असा हा मुद्दा मतदारांच्या मात्र चर्चेचा विषय ठरत आहे. 


कागदावर उरलेली दारूबंदी हटविण्याला काय हरकत?


वर्ध्याच्या दारूबंदीचा इतिहास जर पाहिला तर तो रोचक आहे. 1980 च्या दशकापासून जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. त्यासाठी कायदाही झाला. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मध्ये हा कायदाच तोकडा पडला आहे. छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दारू विक्री सुरू आहे, याची जाणीव पोलिसांना देखील आहे. निवडणूक काळात तर याला अधिकच उत आला आहे. आता केवळ कागदावर उरलेली दारूबंदी हटविण्याला काय हरकत! असाच प्रश्न अनेक जण विचारू लागले आहे. छुप्या मार्गाने तर दारू विकलीच जाते,  पण याहीपलीकडे विषारी दारू आणि नकली दारू देखील शौकीन असणाऱ्यांच्या माथ्यावर मारली जाते.


शेजारच्या नागपूर, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यात दारूबंदी नाही. वरुड -मोर्शी, धामणगाव-चांदुर रेल्वे ही गावे वर्धा लोकसभा क्षेत्रात येतात. मी जर खासदार झालो तर सर्वांना समान न्याय देईल, अशी शपथ मी घेणार आहे. पण दारूबंदी मात्र या शपथीला आड येत आहे, असाच विचार या उमेदवाराचा आहे. कारण वर्धा लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या चार विधानसभा क्षेत्रात दारूबंदी असेल तर वरुड आणि धामणगाव येथे दारूबंदी नाही आहे. त्यामुळे माझे समान न्याय देण्याचे तत्व खोटे ठरत असल्याचा दावा या उमेदवाराने केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या