Devendra Fadnavis On Sharad Pawar : वर्ध्याची भूमी ही स्वातंत्र्याची भूमी आहे. खऱ्याअर्थाने या ठिकाणी भारताचा झेंडा लागला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधी यांची देखील ही पुण्यवान भूमी आहे. याच ठिकाणी महात्मा गांधींनी सांगितलं होतं की, देशाला स्वातंत्र्य मिळाला आहे. देशात आता काँग्रेसची (Congress) गरज नसून तिला विसर्जित केले पाहिजे. मात्र, त्यावेळी काँग्रेसवाल्यांनी गांधीजींची गोष्ट ऐकली नाही. मात्र, गांधीजींची गोष्ट वर्धेकरांनी ऐकली  आणि वर्ध्यात काँग्रेसला विसर्जित करणे सुरू केलं. असे असतानाही काँग्रेसचा पंजा या ठिकाणी शिल्लक होता. मात्र अलीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांचे आपण आभार मानले पाहिजे की, त्यांनी उरलीसुरली काँग्रेस देखील विसर्जित करून टाकली. त्यामुळे वर्धा आता काँग्रेस मुक्त झाला आहे. याचे श्रेय शरद पवार यांना दिले पाहिजे. काँग्रेसपक्षाची एवढी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीही झाली नव्हती ती या ठिकाणी पाहायला मिळत असल्याची घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) काँग्रेस आणि शरद पवारांवर केली  आहे. 


त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय लोक राहणार नाही


मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार रामदासजी तडस ही विजयाची हॅट्रिक मारतील. तर, अमरावतीमध्ये आमच्या उमेदवार नवनीत राणा यादेखील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. नवनीत राणा या त्याच नेत्या आहेत ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून बारा दिवस जेलमध्ये टाकण्यात आले होते. आता महाविकास आघाडीचे काही नेते या ठिकाणी येऊन त्यांच्यावर, एका महिलेबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढत आहेत. हे बघता मी आज एक विश्वासाने सांगतो की त्याला उत्तर या मतदारसंघातील महिलाच देतील. तसेच त्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय लोक राहणार नाही, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला. विदर्भात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहे. महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यात  सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 


सर्व समाजाला सोबत घेऊन मोदीजींचा प्रवास 


मोदींच्या नेतृत्वात देशात दीन-दलित, गोर-गरीब, आदिवासी, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक  कामगार, कष्टकरी, शेतकरी इत्यादि सर्व स्तरातील नागरिकांच्या आयुष्यात मुलभूत परिवर्तन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंत्रिमंडळ हे पहिले असे मंत्रिमंडळ आहे की, या मंत्रिमंडळामध्ये 60% मंत्री हे ओबीसी, एसटी, अल्पसंख्याक समाजाचे आहेत. पहिल्यांदा सामाजिक न्याय शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे. बारा बलुतेदार  लोकांसाठी कोट्यावधीचे  काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आदिवासी बांधवांसाठी 24 हजार कोटी रुपयांची योजना आणली, अनेक उद्योजक नव्याने तयार केलेत.


सर्व समाजाला सोबत घेऊन मोदीजींचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान करण्याचे काम करायचं आहे. त्याकरता आता आपल्या सर्वांचं अबकी बार चारसो पार चा नारा हा सत्यात उतरायचा आहे. त्यासाठी रामदास तडस आणि नवनीत राणा यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून आणायचे आहे. असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केले.  


इतर महत्वाच्या बातम्या