धुळे : धुळे लोकसभा (Dhule Loksabha) मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील (Congress) नाराजीनाट्य समोर आले. एकीकडे काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे मेळावे होत असताना काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याने ते मेळाव्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पक्षाचे नेतृत्वावर आपला विश्वास असून आपली उमेदवारी निश्चित जाहीर होईल, असा विश्वास काँग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी व्यक्त केला आहे.
शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला विरोध
महाविकास आघाडीच्या जागावाटपात धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. काँग्रेसकडून डॉ. तुषार शेवाळे आणि श्याम सनेर ही दोन नावे चर्चेत असताना काँग्रेसने नाशिकमधील डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर काँग्रेसमधील नाराजीनाट्य समोर आले. यानंतर पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाकडे राजीनामे दिले असून जोपर्यंत स्थानिक उमेदवार दिला जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
उमेदवारावर नाही, तर पक्षावर नाराजी
डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे मेळावे सध्या होत असून या मेळाव्यांकडे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाठ फिरवत असल्याने पक्षातूनच शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला होणारा विरोध हा अडचणीचा विषय ठरत आहे. पक्षाने केलेल्या विविध सर्व्हेच्या माध्यमातून डॉक्टर शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. श्याम सनेर यांची नाराजी उमेदवारावर नसून पक्षाचे नेतृत्वावर असल्याचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले. लवकरच त्यांची नाराजी दूर होऊन ते प्रचारात सहभागी झाल्याचे पाहायला मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, पक्षाने कुठल्याही सभेच्या माध्यमातून ही उमेदवारी दिलेली नसून आपला राग हा पक्ष नेतृत्वावर आहे. आपली नाराजी लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठ आपल्या उमेदवारीबाबत शेवटपर्यंत निश्चित विचार करतील, असा विश्वास श्याम सनेर यांनी व्यक्त केला आहे.
एकीकडे भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येच पक्षांतर्गत असलेली नाराजी आणि त्यातून निर्माण झालेली गटबाजी ही भाजपाला विजयासाठी पोषक वातावरण ण निर्माण करीत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. यामुळे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसमधील नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश मिळते का? हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या