Walchandnagar News Updates :   इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथील भारत चिल्ड्रन अकॅडमीची विद्यार्थिनी प्रतीक्षा सुनील पाटील (Pratiksha Patil in Guinness World Records) हिने विश्वविक्रम केला आहे. प्रतीक्षाने एक तास पंधरा मिनिटं अधोमुख श्वानासन (Dog position) मध्ये योगा करण्याचा विक्रम बनवला आहे. प्रतीक्षाच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आले आहे. यापूर्वी 16 ऑगस्ट 2020 मध्ये अमेरिकेच्या किकी फ्लिन या महिलेने एक तास अठरा सेकंद इतका वेळ अधोमुख श्वानासन स्थितीत योगा करण्याचा रेकॉर्ड केला होता. आता या अमेरिकन महिलेचा रेकॉर्ड पुणे जिल्ह्यातल्या वालचंद नगर येथील प्रतीक्षा पाटीलने मोडला आहे. 


प्रतीक्षाने सलग एक तास पंधरा मिनिटे चार सेकंद इतका वेळ श्वानासन स्थितीत योग केला. तिच्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली असून यासंदर्भात तिला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे. सध्या आजादी का अमृत महोत्सव सुरू असून 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 मिनिट हा योगा करावा अशी कल्पना प्रतिक्षाला सुचली.


 त्यानुसार तिच्या शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी तिला मदत केली. 24 जानेवारी 2022 रोजी प्रत्यक्षात योग करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे चित्रीकरण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी फाईल सादर करण्यात आली. त्यानुसार प्रतीक्षा पाटीलच्या विश्वविक्रमाची नोंद घेण्यात आली. प्रतीक्षाच्या यशामुळे शिक्षकांनी आणि तिच्या पालकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. 


प्रतीक्षानं म्हटलं की, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. देशात सध्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यामुळं मी देशासाठी 75 मिनिटं अधोमुख श्वानासन करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्ण झाला. यासाठी मला माझे पालक, शिक्षकांची मोलाची मदत झाली असल्याचं देखील प्रतीक्षानं सांगितलं. 


प्रतीक्षा ही सध्या बारावीचं शिक्षण घेत आहे.