Sidhu Moosewala Murder : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरात राज्यातील कच्छ मधुन अटक केलीय. संतोष जाधव सोबत त्याच्या सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदाराला ही पोलिसांनी अटक केलीय. या दोघांना रात्री बारा वाजता न्यायाधीशांसमोर त्यांच्या घरी नेऊन हजर करण्यात आलं असता त्यांना 20 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.


दीड वर्षांपासून फरार


संतोष जाधव हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचा राहणारा असुन दीड वर्षांपासून तो राण्या बाणखेले नावाच्या गुडांचा खुन केल्यापासून फरार होता. त्यानंतर तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाला होता. या टोळीकडून खंडणी वसूल करण्यासाठी काही दिवसांपुर्वी त्याने राजस्थानमधील गंगापूर शहरातील एका व्यापाऱ्यांवर गोळीबार केला होता. मात्र संतोष जाधवची चर्चा तेव्हापासून सुरु झाली, जेव्हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात त्याच नावं घेण्यात आलं. त्याचबरोबर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल देखील त्याच नाव घेण्यात आलं.


गुजरातमधील कच्छ मधून त्याला अटक


संतोष जाधवचा पंजाब, दिल्ली आणि मुंबई पोलीसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला. त्यासाठी वेगवगेळ्या राज्यातील पोलीस पुण्यात तळ ठोकून आहेत. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील कच्छ मधून त्याला अटक करण्यात यश मिळवलय. काही दिवसांपुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे या त्याच्या साथीदाराला ही अटक केली होती.


सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या 


पंजाबमधील आप सरकारनं काल 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली. आप सरकारनं ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता. 


लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली हत्येची जबाबदारी


मानसा जिल्ह्यात रविवारी शुभदीप सिंह सिद्धू उर्फ ​​सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याच्या वेळी मुसेवाला त्यांच्या थार जीपमधून प्रवास करत होते. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईक आणि एक मित्र जखमी झाला. मुसेवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा येथून पंजाब विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आपचे उमेदवार विजय सिंहला यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे.


सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर हत्या


पंजाब सरकारनं सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी मानसा जिल्ह्यातील मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी उसळली होती. सिद्धू मुसेवाला सहा महिन्यांनी लग्न करणार होते. मुसेवाला यांची अंतिम यात्रा त्यांच्या आवडत्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आली. मुसेवाला यांनी त्यांची अनेक गाणी या ट्रॅक्टरवर शूट केली होती.