सांगली : येत्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णाकाठच्या लोकप्रतिनिधींना बोलवून वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यंदा पुराची शक्यता नाही, मात्र तरीही प्रशासन सज्ज आहे. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता सर्व तयारी करण्यात आली आहे, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपुर्व तयारी आणि कोरोना आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. याबैठकीनंतर पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. धरणातील पाण्याच्या नियोजनाबाबत कर्नाटक राज्याशी आतापासूनच बोलणी सुरु करण्यात येणार असल्याचंही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.


सांगली जिल्ह्यात गतवर्षी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना 'यंदा महापूराची शक्यता नाही मात्र तरीही प्रशासन सज्ज झालेला आहे. गतवर्षी आलेला महापूर लक्षात घेता राज्य सरकारकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहेत. प्रशासन पातळीवर योग्य त्या नियोजनाबाबत सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकराज्यातल्या पाण्याच्या नियोजनाबाबत कर्नाटक राज्याशी ही बोलणी सुरु करण्यात येणार आहे, त्याच बरोबर पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास कर्नाटक मधील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याच्या बाबतीतही नियोजन आणि त्यादृष्टीने बोलणी सुरु करण्यात येणार आहेत.' , असं जयंत पाटील यांनी बोलताना स्पष्ट केलं.


पाहा व्हिडीओ : सांगली, कोल्हापूरच्या पुराला 'अलमट्टी' जबाबदार नाही,वडनेरे समितीची अलमट्टीला क्लिनचिट



गतवर्षी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या वडनेरे समितीचा अहवाल तयार झालेला आहे. या अहवालावर चर्चा करण्यासाठी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींची सांगलीमध्ये लवकरच एक बैठक घेऊन वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात येणार असल्याचेही यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.


संभाव्य पुरस्थिती हातळण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा, आवश्यक सामुग्री अद्यावत ठेवावी, असे निर्देश देऊन पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, 'महसुल मंडळनिहाय पावसाची दैनंदिन माहिती सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता अशा दोन्ही वेळेला घ्यावी. पाण्याखाली जाणारी गावे, प्रामुख्याने नदीकाठची गावे या ठिकाणी पाणीपातळी बद्दल नागरिकांना त्वरीत आवगत करण्यासाठी ध्वनीक्षेपण यंत्रणा व्यवस्थीत ठेवावी आणि त्याप्रमाणे पाणी पातळीत वाढ होत असताना त्वरीतसुरक्षीतस्थळी जाण्याबाबत सूचित करावे. रेस्क्युसाठी वापरण्यात येणाऱ्या बोटींमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे बसू नयेत यासाठी बोटीच्या सर्व बाजूनीं मन्युष्य क्षमता ठळकपणे लिहावी, कोणत्याही परिस्थीतीत ब्रह्मनाळ सारखी घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी. पुरप्रवर क्षेत्रातील लोकांमध्ये जागृती करण्यासाठी विविध ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रिल करावे. ज्या नागरिकांकडे जनावरे आहेत. त्यांनी पाणी पातळीत वाढ
होण्याची सूचना मिळताच जनावरांसह सुरक्षीतस्थळी जावे.' असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


पाहा व्हिडीओ : पूर परिस्थितीसाठी सांगली पालिकेचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार! स्पेशल रिपोर्ट



कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत कर्नाटक सरकारमधील अधिकाऱ्यांशीही समन्वय साधण्यात येत असल्याचे सांगून या बैठकीत त्यांनी पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, आरोग्य, पशुसंवर्धन विभागांचा आढावा घेतला. 'गतवर्षीच्या पुराचा अनुभव लक्षात घेवून जलसंपदा विभागकडून वेळेवर पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगून, मान्सून काळात यंत्रणेतील प्रत्येक घटकाने अर्लट रहावे. आपले दूरध्वनी, मोबाईल फोन 24 तास सुरु ठेवावेत' असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते बी बियाने, किटकनाशके पुरेशा प्रमाणत उपलब्ध करुन द्या, बोगस बियाणांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, याची दक्षताही कृषी विभागाने घ्यावी. पावसाळ्यातील साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर पुरेसा औषधसाठा, उपचारासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध ठेवावी, जनावरांचा लसीकरण करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले आहेत.


संबंधित बातम्या : 


कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे? सरकार समोर प्रश्न; मात्र प्रसंगी कर्ज काढू : जयंत पाटील


सांगलीतील महापुराला कर्नाटकमधील अलमट्टी धरण कारणीभूत नाही; वडनेरे समितीचा अहवाल