Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) पदवीधर प्रवर्गातील निवडणुकीसाठी 11 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारांद्वारे जोरात प्रचार सुरू आहे. यावेळी नव्या दमाच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर धरला असल्याने प्रस्थापितांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.


विद्यापीठाद्वारे पदवीधर प्रवर्गातील मतदार नोंदणी करण्यात आली. जवळपास चाळीस हजारावर नोंदणी झाली. निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी संघटना, यंग टीचर्स-सेक्युलर आणि विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद, विद्यापीठ परिवर्तन पॅनल, युवा ग्रॅज्युएट फोरम, शिक्षक भारती यांच्यासह विविध संघटनांनी उमेदवारी दिली आहे. यंदा निवडणुकांमध्ये अभाविपकडून (ABVP) अनुभवी उमेदवारांना प्राध्यान्य दिलेले आहे. याशिवाय विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषदेचे अॅड. मनमोहन वाजपेयी हे चौथ्यांदा निवडणुका लढवत असून अभाविपचे माजी सदस्य प्रविण उदापुरे या पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत. 


पदवीधर मतदारसंघातून विजय मिळविणारे आमदार अॅड. अभिजित वंजारी यांचे नेटवर्क असल्याने यंदा त्यांचे पॅनल अभाविपसमोर मोठे आव्हान उभे करणार असल्याचे दिसते. याशिवाय गेल्या निवडणुकांमध्ये कामगिरीने अनेकांच्या भुवया उंचावणारे विद्यापीठ परिवर्तन पॅनलही रिंगणात आहे. बहजन आणि अनुसूचित जातीच्या मतदारांना वळविण्यात त्यांना यश आले होते. यावेळी परिस्थिती वेगळी असून या पॅनलमधून 'युवा ग्रॅज्युएट फोरम' वेगळे झाल्याने त्यांना मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, या पॅनलमधील विद्यार्थी चळवळीत सक्रीय असलेले उमेश कोर्राम उमेदवार असल्याने ओबीसी गटात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.


गेल्यावेळी अभाविपचे सहा उमेदवार निवडून आले होते. त्यापैकी दोन खुल्या गटात तर प्रवर्गातील सर्व चार जागांवर त्यांनी विजय मिळविला होता. यावेळीही अशीच कामगिरी करण्यावर त्यांचा भर आहे. मात्र, खुल्या गटात अभाविपला धक्का बोलल्या जात आहे.


आमदारांची प्रतिष्ठा पणाला


पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या गडाला खिंडार पाडून अॅड. अभिजित वंजारी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. त्यामुळे यावेळी पॅनलमधील अधिकाअधिक उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.


पत्ता नसलेले 7 हजार 540 मतदार


विद्यापीठाच्या (RTMNU) मतदार यादीतील चुकांची यादी खूप मोठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 हजार 540 मतदारांच्या नावांविरोधात कोणताही पत्ता लिहिलेला नाही. अशा स्थितीत हा मतदार कुठला रहिवासी आहे? तुम्ही तिथे किती दिवस राहत आहात? की हे बनावट मतदार आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा त्रुटी दूर करण्यासाठी विद्यापीठाने कोणतीही यंत्रणा उभारली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. माजी सिनेट सदस्य प्रशांत डेकाटे आणि अॅड. मनमोहन बाजपेयी यांनीही या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.


ही बातमी देखील वाचा


Nagpur Extortion case : खंडणी वसूली प्रकरणी अखेर धर्मेश धवनकर सक्तीच्या रजेवर; नोटिशीच्या उत्तराने विद्यापीठ असमाधानी