Nagpur News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील (मेडिकल) GMC रॅगिंग प्रकरण चांगलेच गाजत आहे. एकीकडे व्हिडिओतून रॅगिंग झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर दुसरीकडे 107 विद्यार्थ्यांनी रॅगिंग झालीच नाही, अशी ग्वाही देणारे पत्र प्रशासनाला दिले. मात्र व्हिडिओ पाहून तत्काळ सहा विद्यार्थ्यांना निलंबित केले. या प्रकरणातील चौकशीसाठी अजनी पोलिसांचे पथक शनिवारी रॅगिंग प्रकरणात काही प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदवण्यासाठी मेडिकलमध्ये पोहोचले. मात्र विद्यार्थ्यांची अंतर्गत परीक्षा सुरू होती. यामुळे विद्यार्थ्यांची साक्ष नोंदवणे लांबणीवर गेले आहे.


विद्यार्थ्यांमध्ये करणार जनजागृती


कायद्याच्या चौकटीतून रॅगिंग प्रकरणातील गंभीरता, शिक्षा व इतर माहिती विद्यार्थ्यांना नसते. एक मजा म्हणूनच याकडे विद्यार्थी बघतात. यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी नागपुरातील (Nagpur) पोलिसांकडून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग विषयावर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी लवकरच तारीख निश्चित होणार असून तेथे खुद्द पोलिस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) मार्गदर्शन करतील अशी माहिती आहे.


तिसऱ्याकडून प्रकरण उघडकीस


सहा महिन्यांपूर्वी हा संपूर्ण प्रकार घडला असून सीनियर विद्यार्थ्यांच्या दबावामुळे पीडित विद्यार्थ्यांनी उशिरा तक्रार केल्याचेही डॉ. राज गजभिये म्हणाले. रॅगिंगचा हा प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने त्याची तक्रार आणि काही पुरावे सेन्ट्रल रॅगिंग समितीकडे पाठविले होते. सेंट्रल रॅगिंग कमिटीनेक महाविद्यालय प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर महाविद्यालयाने ही कारवाई केली असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली.


सर्व सीनियर्स 2017 च्या बॅचमधील


प्राप्त माहितीनुसार रॅगिंग करणारे सर्व सहा विद्यार्थी हे मेडिकल (GMC) 2017 च्या बॅचमधील आहेत. मागील सहा महिन्यांपूर्वी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षामध्ये शिकणाऱ्या 2021-2022 च्या बॅचमधील विद्यार्थ्याची 2017 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली. याचा एका विद्यार्थ्याने व्हिडीओ तयार केला. प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सीनियर्सकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता. विद्यार्थ्याने या घटनेची तक्रार 'अँटी रॅगिंग नॅशनल हेल्पलाईन' क्रमांकावर नोंदवली होती. सोबत व्हिडीओही जोडला होता. यासंदर्भात सोमवारी रात्री अधिष्ठातांना मेल पाठवण्यात आला होता. मंगळवारी दुपारी हा मेल चेक केला असता विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची खात्री झाली. त्यानंतर लगेचच अॅंटी रॅगिंग समितीची बैठक बोलावून चर्चा करण्यात आली. तसेच सायंकाळी या प्रकरणी दोषी आढळलेल्या सर्व सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले.


ही बातमी देखील वाचा


नागपुरातून दुपारी साडेबाराला निघाले अन् सायंकाळी सव्वा पाचला शिर्डीत पोहोचले; जेवण केलं, सत्कार स्विकारत पावणेपाच तासात 529 किमी अंतर पार