Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) सात विभाग प्रमुखांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी जनसंवाद विभागाचे प्रा. डॉ. धर्मेश धवनकर (Dharmesh Dhawankar) यांच्याविरुद्ध कारवाई करीत विद्यापीठ प्रशासनाने त्यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. गंभीर प्रकरण असतानाही विद्यापीठाकडून धवनकर यांची पाठराखण करण्यात येत असल्याचे आरोप होत होते. त्यानंतर राज्य सरकारनेही (State Government) प्रकरणात लक्ष दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने अॅक्शन मोडवर येत ही धवनकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले.


प्राप्त माहितीनुसार 7 जानेवारीपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, तोपर्यंत त्यांना विद्यापीठ (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) परिसरातही बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने अधिकृत कळविलेले नाही. मात्र, प्रशासनातील एका खात्रीशीर सूत्राने या माहितीला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी यासंदर्भात पत्र जारी झाल्याचे या सूत्राचे म्हणणे आहे. डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरोधात विद्यापीठातील सात विभाग प्रमुखांनी कुलगुरुंकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार धवनकर यांनी विभाग प्रमुखांना खोट्या तक्रारींची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केली असल्याचा आरोप आहे.


यासंदर्भात सातही विभागप्रमुखांनी एकत्रितपणे कुलगुरुंकडे तक्रार केली. विद्यापीठ प्रशासनाने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. मात्र माध्यमांमध्ये बातम्या छापून आल्यावर विद्यापीठ प्रशासनाने धवनकर यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. सुरुवातीला उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची वेळ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ दिली. गेल्या 28 नोव्हेंबर रोजी धवनकर यांनी नोटीसला उत्तर दिले.परंतु या उत्तराने प्रशासनाचे समाधान न झाल्याने प्रशासनाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली. चौकशी पूर्ण होईपूर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे सांगितले जात आहे.


...म्हणे लैंगिक शोषणाबाबत करा जागृती


जनसंवाद विभागाचे प्रा. धर्मेश धवनकर यांच्यावर कारवाईसाठी दिरंगाई करणाऱ्या नागपूर विद्यापीठ प्रशासनाने लैंगिक शोषणाविरोधी धडे देण्यासाठी सरसावले आहे. यासंदर्भात जागृतीपर कार्यक्रम आय़ोजित करण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले आहे. त्यामुळे नव्याच चर्चेचला तोंड फुटले आहे. लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचारविरोधी संरक्षण या विषयावर जनजागृतीपर पंधरवाडा आयोजित करावा, अशा सूचना विद्यापीठाने आपले विभाग आणि महाविद्यालयांना दिल्या आहेत. 25 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान कार्यक्रम आयोजित करावे असे विद्यापीठाच्या पत्रात म्हटले आहे. मात्र हे पत्र विद्यापीठाने 1 डिसेंबर रोजी वितरीत केले आहे. तसेच 9 डिसेंबरपर्यंत कार्यक्रम घेऊन त्याचा अहवाल 10 डिसेंबरपर्यंत विद्यापीठाला पाठविण्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी मेल आयडी देखील देण्यात आला आहे. यासोबतच अहवालाची प्रत विद्यापीठाच्या लैंगिक शोषण व लिंगभेद अत्याचारविरोधी संरक्षण समितीला पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.


ही बातमी देखील वाचा


Mahaparinirvan : महापरिनिर्वाण दिनानिमित्त 10 विशेष रेल्वे गाड्या : जाणून घ्या वेळापत्रक