पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीला केलेला वज्रलेप अल्पावधीत निघू लागल्याने विठ्ठलभक्तांची चिंता वाढू लागली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुरक्षित असेल तरच वारकरी संप्रदायाच्या अस्तित्वाला अर्थ असल्याची भावना विठ्ठल भक्तांमध्ये असते. त्यामुळे देवाच्या मूर्तीबाबत सर्वात जास्त काळजी ही लाखो विठ्ठल भक्तांना असते. मात्र अलिकडच्या काळात मूर्तीबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता होऊ लागल्याने मंदिर समिती आणि प्रशासनाच्या कारभारात राज्य सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे का असे विचारायची वेळ आली आहे.
 
विठूरायाची मूर्ती ही वालुकाश्म दगडापासून बनलेली आहे तर रुक्मिणी मातेची मूर्ती ही शाळीग्रामाच्या चकचकीत दगडाची आहे. तुलनात्मक दृष्टीने पाहता विठ्ठल मूर्तीची झीज जास्त प्रमाणात होत असल्याने आतापर्यंत चार वेळा मूर्ती संवर्धनासाठी सिलिकॉन किंवा इपॉक्सीसारखे रासायनिक लेपन मूर्तीला करण्यात आले आहेत. ज्या मूर्तीवर वर्षाकाठी सव्वा कोटी भाविक चरणावर स्पर्श करुन दर्शन घेतात त्या मूर्तीची झीज होताच राहणार आहे आणि यासाठी मूर्तीवर लेपन क्रिया आवश्यक आहे. 


मात्र मूर्तीची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने दिलेल्या सूचनांचा कधी मंदिर समिती आणि प्रशासनाने गांभीर्याने विचार न केल्याने विठ्ठल रुक्मिणी मूर्तींचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. ज्या ज्या वेळी पुरातत्व विभागाने मूर्ती संवर्धनासाठी प्रक्रिया केली त्या प्रत्येक वेळी त्यांनी मंदिर समितीला मूर्ती संवर्धनासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या, ज्याचा आजपर्यंत कधीही अवलंब न झाल्याने ही वेळ आली आहे. 


विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील उष्णता, दमटपणा निर्माण करणारे घटक काढून टाकण्याची महत्त्वाची सूचना पुरातत्व विभागाने दिली होती. यामध्ये देवाच्या गाभाऱ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी 22 वर्षांपूर्वी गाभाऱ्यात चकचकीत ग्रॅनाईटच्या फरशा भिंतीवर लावण्यात आल्या होत्या. त्या फरशा काढून मूळ रुपातील दगडी गाभारा बनवण्याची महत्त्वाची सूचना आजही मंदिराच्या फाईलमध्येच पडून आहे. याशिवाय गाभाऱ्यात वापरण्यात येणारे प्रखर उष्णता निर्माण करणारे विजेचे दिवे बदलण्याच्या सूचनेचीही अंमलबजावणी केली नाही. 


मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करणारे दूध, दही, साखर, मध अशा पदार्थांचा अतिशय अल्प प्रमाणात वापर करण्याची सूचना दिल्या होत्या. मात्र आजही रोजच्या नित्योपचारात मूर्तीला दुधाचे स्नान असेल किंवा साखरेचा वापर असेल हा सढळ हाताने होत आहे. श्रद्धा नक्कीच महत्त्वाची आहे मात्र जेव्हा मूर्तीच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हातरी किमान यात सूचनांचे पालन आवश्यक असतं. 


अलिकडच्या काळात विविध एकादशी, धार्मिक सण यादिवशी विठ्ठल-रुक्मिणी गाभारा विविध प्रकारच्या फुलांनी आणि फाळणी सजवण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. ही आकर्षक सजावट अतिशय सुंदर असते पण यामुळे पुन्हा गाभाऱ्यातील दमटपणा आणि उष्णता वाढून मूर्तीवर विपरीत परिणाम होता याचा गांभीर्याने विचार केला जात नाही. पुरातत्व विभागाने विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनासाठी दिलेल्या सूचना पायदळी तुडवल्या जात असल्यानेच आता हा लाखो भाविकांचे आराध्य वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. एबीपी माझाने वज्रलेपानंतरही मूर्तीची होत असलेली धक्कादायक झीज दाखवल्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तातडीने भारतीय पुरातत्व विभाग, सोलापूर जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीची ऑनलाईन बैठक घेत हा विषय गांभीर्याने घेतला आहे. मात्र मंदिर समितीला याचे कितपत गांभीर्य आहे हा प्रश्न वारकरी विचारात असून जर गांभीर्य असते तर वर्षानुवर्षे पुरातत्व विभागाने दिलेल्या अत्यंत महत्वाच्या सूचनांची अंमलबजावणी झाली असती. 


विठ्ठल रुक्मिणी हे वारकरी संप्रदायाचे आराध्य आहे. ज्ञानोबा तुकारामांच्या आधीपासून या मूर्ती कोट्यवधी विठ्ठलभक्तांना प्रेरणा आणि शक्ती देत आल्या आहेत. भविष्यातील भावी पिढ्यांसाठी ही शक्तिस्थाने अबाधित ठेवण्याची जबाबदारी आता राज्य शासनाची असून याबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने हालचाली केल्यास पंढरीचा सावळा विठुराया पुढची शेकडो वर्षे भविष्यातील पिढ्याना दर्शन देण्यासाठी अस्तित्वात असणार आहे. 


संबंधित बातम्या


विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरण : मूर्तींना पुन्हा लेपन होणार, मंदिर समितीला सूचनांचं तंतोतंत पालन करावं लागणार


ABP Majha Impact : विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी मंदिर समिती तातडीची बैठक घेणार