नांदेड : मुलीच्या ठरलेल्या लग्नासाठी पैसे कुठून आणायचे. लग्नासाठी आता शेती विकावी लागणार, अशा विंवचनेतून बापाने पोटच्या मुलीला संपवल्याची घटना नांदेरमध्ये घडली आहे. बालाजी विश्वंभर देवकते (वय 40 वर्ष) असं या निर्दयी बापाचं नाव आहे. त्याने स्वतःची मुलगी सिंधूताई बालाजी देवकते (वय 18 वर्ष) हिच्या डोक्यात लाकडी बाजेचे गात (माचवा) घालून तिचा खून केला. मुखेड तालुक्यातील जामखेड इथे ही धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली.
बालाजी देवकते हा जामखेडमधील पाच एकर कोरडवाहू शेती असणारा अल्पभूधारक शेतकरी आहे. पत्नी, दोन मुलं आणि दोन मुली असा त्याचं कुटुंब आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून शेतातून हवे तसं उत्पन्न मिळालं नाही. त्यात कोरोना महामारी, महागाई यामुळे कुटुंब आणखीच आर्थिक अडचणीत आलं होतं. त्यातच सिंधुताई देवकते ही विवाह योग्य झाल्यामुळे तिच्या लग्नाची बोलणी झाली होती. मात्र लग्न तिथीनुसार तारीख मात्र निश्चित करण्यात आली नव्हती. मुलीच्या ठरलेल्या लग्नासाठी पैसे कुठुन जमा करायचे यावरुन बालाजी देवकते आणि त्यांची पत्नी यांच्यात खटके उडत होते.
दरम्यान मुलीच्या लग्नासाठी पैशांच्या जुळवाजुळवीच्या विवंचनेत असणाऱ्या बालाजी देवकतेला आता लग्नासाठी शेती विकावी लागणार ही चिंताही सतावत होती. त्यातच लग्नासाठी पैसे जमा करु यावरुन बालाजी देवकते आणि पत्नी अहिल्याबाई यांच्यात भांडण सुरु झालं. यावेळी ते पत्नीला शिवीगाळ करुन वाद घालत होते. यावेळी हे भांडण सोडवण्यासाठी मुलगी सिंधुताई मध्ये पडली. परंतु यावेळी बालाजी देवकतेने रागाच्या भरात बाजेच्या लाकडी गातने ( माचवा) मुलीच्या डोक्यात वार केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली, शिवाय रक्तस्त्राव अधिक झाल्याने ती जागेवरच गतप्राण झाली. तर पत्नी अहिल्याबाईलाही मारहाण झाल्याने ती जखमी झाली आहे.
अशाप्रकारे मुलीची हत्या आणि पत्नीला जखमी करुन आरोपी बालाजी देवकते मात्र पसार झाला आहे. दरम्यान मुखेड पोलीस ठाणे इथे मृत सिंधूताई देवकतेच्या आईच्या तक्रारीवरुन भादंवि कलम 124/2022, कलम 302, 324,506, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी बालाजी देवकतेचा शोध घेत आहेत.