Nagpur : अयोध्येतील (Ayodhya) प्रभूश्री राम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. सुमारे 500 वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला अखेर यश आलं असून कोट्यवधी भारतीयांची प्रतीक्षा 22 जानेवारी 2024 या दिवशी संपली. राम मंदिर निर्माण व्हावे या साठी सुरू झालेल्या लढ्यात आजवर अनेक कारसेवकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत साऱ्यांनीच आपले महत्वपूर्ण योगदान दिले. त्यातीलच एक अग्रगण्य नाव म्हणजे विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) हे होय. अनेक दशकांपासून राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभारणारी विश्व हिंदू परिषद राम मंदिर अस्तित्त्वात झाल्यानंतर कोणतं नवं आंदोलन उभारणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. त्याचाच उत्तर दिलंय विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी. 


विश्व हिंदू परिषदेच्या अजेंड्यावर पुढे काय? 


मिलिंद परांडे यांनी एबीपी माझाशी एक्लुसिव्ह बातचीत करताना विश्व हिंदू परिषदेच्या अजेंड्यावर काशी विश्वनाथ मंदिर आणि मथुरेतील कृष्ण जन्मभूमीचे विषय प्रामुख्याने असल्याचे मत व्यक्त केले. त्याबाबतीत सध्या सुरु असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत समोर आलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारे न्यायालयीन निर्णय हिंदू समाजाच्या बाजूने येईल. त्यामुळे काशी आणि मथुरेसाठी आंदोलनाची आवश्यकता पडणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी बोलतांना व्यक्त केला. मात्र, कटुता नष्ट करण्यासाठी मुस्लिमांनी काशी विश्वनाथ आणि मथुरेतील कृष्ण जन्मभूमीचे स्थान हिंदू समाजाला स्वतःहून सोपवावे अशी मागणी देखील मिलिंद परांडे यांनी केली.


मुस्लिम समाजाने दोन्ही मंदिरे स्वतःहून सोपवावी


काही कट्टरवादी मुस्लिम नेते सामान्य मुस्लिमांची दिशाभूल करून मुस्लिम समाजाला आत्मघाती मार्गावर नेत आहे. मुस्लिम नेत्यांची चुकीची वक्तव्ये मुस्लिमानांना चिथावणी देऊन धोक्याच्या मार्गावर ढकलत असल्याचेही परांडे म्हणाले. काशी आणि मथुरेत मंदिर होते हे सुस्पष्ट आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने स्वतःहून दोन्ही मंदिरं हिंदू समाजाला सोपवावी अशी आमची अपेक्षा आहे. मात्र मुस्लिम नेतृत्व असे होऊ देत नसून मुस्लिम समाजाने अशा मुस्लिम नेतृत्वाबद्दल पुनर्विचार करावं, अशी अपेक्षा ही विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे. 


उत्तराखंड प्रमाणे इतरांनी ही सामान नागरी कायदा लागू करावा 


घटनाकारांच्या अपेक्षेनुसार सामान नागरी कायदा लागू करणाऱ्या उत्तराखंड सरकारचे आम्ही अभिनंदन करतो. सामान नागरी कायदा लागू झाल्याने फक्त सर्वांसाठी सारखा कायदा एवढाच फायदा होणार नाही. तर महिला आणि लहान मुलांची सुरक्षा देखील वाढणार आहे. उत्तराखंड नंतर इतर राज्यांनी ही सामान नागरी कायदा लागू करण्याचे प्रयत्न करावे. तसेच केंद्राने ही ते लागू करावे अशी विश्व हिंदू परिहादेची अपेक्षा असल्याचे परांडे म्हणाले. सीएए कायदा संसदेत पारित झालेला आहे. आता फक्त त्याच्या अमलबजावणीसाठी नियम बनविणे आवश्यक असून लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यासंदर्भात नियम तयार करावे, अशी ही विहिंपची अपेक्षा असल्याचे परांडे म्हणाले आहे. 


हिंदू हित, हेच देश हित


हिंदू हित, हेच देश हित असून हिंदू संस्कृती आणि इतिहास हेच देशाची संस्कृती आणि इतिहास आहे. त्यामुळे देशातील हिंदूंनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करताना हिंदू हिताचा विचार करणाऱ्या उमेदवारांनाच मतदान करावं. त्यासाठी विहिंप हिंदू हिताचा विचार करून मतदान करा यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती ही परांडे यांनी दिली. वट वृक्ष हे विश्व हिंदू परिषदेचा गेले 60 वर्ष पंजीकृत बोधचिन्ह आहे. त्यामुळे लोकांची गफलत होऊ नये म्हणून शरद पवार यांच्या पक्षाला आमचा वट वृक्ष हे पक्षीय चिन्ह म्हणून देऊ नये. अशी आमची अपेक्षा असल्याचे ही परांडे म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या