वर्धा : व्हर्जिनिटी टेस्ट म्हणजेच कौमार्य चाचणी आता राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं कौमार्य चाचणी अवैज्ञानिक असल्याचं मान्य करत अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे असा निर्णय घेणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.




वैद्यकीय अभ्यासक्रमात कौमार्य चाचणीचा समावेश आहे. त्यात कौमार्य चाचणीची व्याख्या, लक्षण, न्यायवैद्यकीय महत्त्व, खरी कुमारी, खोटी कुमारी आदी बाबींचा समावेश आहे. टु फिंगर किंवा प्रोबद्वारे ही तपासणी केली जाते. ही कौमार्य चाचणी केवळ स्त्रियांपुरतीच मर्यादीत असून पुरुषांच्या कौमार्य तपासणीचा उल्लेख नाही.



वैद्यकशास्त्रात कुठलंही संशोधन नसताना अनेक वर्षांपासून याचा अभ्यासक्रमात समावेश आहे. ही चाचणी अवैज्ञानिक असल्याबाबचा अहवाल वर्ध्याच्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर इंद्रजित खांडेकर यांनी केंद्र सरकार, भारतीय वैद्यक परिषद, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडं पाठविला. त्यामध्ये कौमार्य चाचणी अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी करण्यात आली.



या अहवालावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या डॉक्टर रामानंद भर्मा यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासक्रम मंडळात चर्चा झाली. त्यात सखोल चर्चेनंतर कौमार्य चाचणी अवैज्ञानिक तसेच अशास्त्रीय असल्याचा मुद्दा मान्य करीत अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय अभ्यास मंडळाच्या वतीनं घेण्यात आला. त्यामुळं लवकरच राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातून या चाचणीचा भाग वगळला जाईल, असं डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी सांगितलं.

डॉ. इंद्रजित खांडेकर

पुस्तकात दिलेल्या माहितीला वैज्ञानिक समजून अनेक न्यायालये महिलांच्या कौमार्य चाचणीचे आदेश देतात. तसेच डॉक्टरांच्या मतांना वैज्ञानिक मानतात. त्यामुळं न्यायालयात ही चाचणी अवैज्ञानिक असल्याचे अवगत करण्याबाबत वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यावे, असं डॉ. खांडेकर म्हणाले. तब्बल नऊ वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे. ज्याच्या अभ्यासक्रमातून ही चाचणी वगळली गेल्यानंतर आता देशाच्या अभ्यासक्रमातून ही चाचणी वगळण्याकरीता लढाई लढावी लागणार आहे.