मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसमधून नेते आणि आमदारांनी बंडखोरी करत अथवा आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले होते. अशा नेते आणि आमदारांवर कारवाई होणार का? याकडे लक्ष लागून आहे.

आज मुंबईत काँग्रेसची महत्वाची बैठक असून या बैठकीत काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांवर कारवाईसह दुष्काळ आणि अन्य विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्या आमदारांच्या भवितव्याबाबतही चर्चा होणार आहे

लोकसभा निवडणुकीत पक्षाला आव्हान देत काँग्रेसच्या अनेक आमदारांनी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला मदत केली आहे. काही आमदारांनी तर उघडपणे भाजप आणि शिवसेना उमेदवारांसाठी काम केलं आहे.

यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, नायगावचे आमदार कालिदास कोळंबकर, कणकवलीचे आमदार नितेश राणे आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा समावेश आहे. यातील विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाने स्वीकारला आहे, मात्र त्यांच्यावर अन्य कोणतीच कारवाई झालेली नाही.

केवळ अब्दुल सत्तार यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने निलंबनाची कारवाई केलेली आहे. मात्र पक्षविरोधी काम करणाऱ्या इतर आमदारांवर मात्र पक्षाने काहाही कारवाई केलेली नाही. ज याबाबत काँग्रेसच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक आता चार महिन्यांवर आली आहे. त्यामुळे हे आमदार काँग्रेस सोडून इतर पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.