औरंगाबाद : औरंगाबादचे पोलीस राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा पोलीस घेणार आहेत. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पोलीस पुढची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 16 अटी-शर्तींवर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली होती. या अटी-शर्तींचं पालन मनसेच्या सभेत झालं की नाही याची पडताळणी देखील पोलीस करणार आहेत.
अटी पाळल्या गेल्या का याचा अभ्यास केला जाईल. उल्लंघन झालं असेल तर कायदेशीर कारवाई केली जाईल असं औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी म्हटलं होतं. दरम्यान राज ठाकरे यांच्या सभेसाठी घातलेल्या अटींपैकी तीन अटींचं उल्लंघन केल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होतं. या अटी खालीलप्रमाणे आहेत.
- या सभेत ध्वनी प्रदूषणाच्या अटीचं उल्लंघन झालं. ज्या ठिकाणी सभा झाली तो रहिवासी भाग असल्यामुळे डेसिबलची मर्यादा 50-55 एवढी होती. परंतु सभेला आलेल्या लोकांची संख्या पाहता ही अटीचं इथे पालन झालं नाही.
- 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने कोणताही धर्म, प्रांत, वंश ,जात यावरुन कोणाचा अनादर होईल अशी वक्तव्ये करु नये. पण राज ठाकरेंचं भाषण पाहिल्यास हे देखील अट इथे पाळली गेली नाही.
- 15 हजार लोकच या सभेला बोलवावेत अशी अट होती. परंतु राज ठाकरेंची सभा पाहिल्यास १५ हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. खरंतर ही अट पाळणं त्यांच्याही हातात नव्हतं.
आज औरंगाबाद पोलीस आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त या संदर्भात काय निर्देश देतात हे पाहावं लागेल.
दरम्यान, कायदा-सुव्यस्था, राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला पोलिसांनी अटी-शर्तींसह परवानगी दिली होती. यासाठी औरंगाबाद पोलिसांनी 16 अटी-शर्ती घातल्या होत्या. या अटी-शर्ती खालीलप्रमाणे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी 'या' अटी-शर्ती :
- ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे
- लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
- इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
- सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही
- 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरुन वक्तव्य करु नये
- व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी
- सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये
- वाहन पार्किंगचे नियम पाळावे
- सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही
- सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल
- सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये
- सभेदरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शन करु नये
- सभेच्या ठिकाणी 15 हजारांपेक्षा जास्त लोकांना निमंत्रण करु नये
- सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी निर्देशित केलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारावे
- अत्यावश्यक सुविधा यांना बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- कार्यक्रमादरम्यान मिठाई किंवा अन्न वाटप होत असल्यास त्यातून विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी
- सभेत स्वयंसेवक नेमावेत, त्यांचे नाव, मोबाईल नंबर, शहराबाहेरील निमंत्रित नागरिकांच्या वाहनांची शहरं, संख्या, येण्या-जाण्याचा मार्ग, लोकांची अंदाजे संख्या एक दिवसआधी पोलिसांकडे द्यावी.
संबंधित बातम्या
- Raj Thackeray यांच्या सभेनंतर गृहखातं अॅक्टिव्ह मोडमध्ये, गृहमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार
- Raj Thackeray On Loudspeakers: 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, भोंग्यांवरून राज ठाकरे यांचा सरकारला इशारा
Asaduddin Owaisi : राज ठाकरेंप्रमाणे महाराष्ट्रभर घेणार सभा, कुठे कुठे होणार सभा? खासदार ओवेसींची माहिती
Hanuman Chalisa Row : मनसेच्या हनुमान चालीसा कार्यक्रमात आमचे कार्यकर्ते सहभागी होणार नाहीत : विहिंप