Maharashtra Heat Wave Update : उष्माघातामुळे (Heat Wave) राज्यात गेल्या दोन महिन्यांत तब्बल 25 जणांचा बळी गेला आहे. तर राज्याची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात (Nagpur) उष्णाघातामुळं सर्वाधिक बळी गेले आहेत. उष्णाघातामुळे नागपूरमध्ये तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उष्माघाताच्या बळींची गेल्या आठ वर्षांतील ही उच्चांकी नोंद आहे. 


यंदाच्या वर्षात वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटांनी राज्यातील लोकांच्या अंगाची लाहीलाही केली आहे. एकामागोमाग येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे यंदा मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात 25 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाला आहे. तर 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजेच, सुमारे 44 टक्के मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळं विदर्भात तापमान 45 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलं आहे. परिणामी विदर्भात उन्हाच्या तडाख्यानं नागरिक हैराण झाले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा जास्तच कडाक्याचा होता. त्यामुळे यंदा उष्माघाताची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.


वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्यांना पत्र


केंद्रीय आरोग्य सचिवांच्या पत्रानुसार, IDSP चा हा दैनंदिन देखरेख अहवाल राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) सोबत शेअर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि NCDC द्वारे राज्यांसह सामायिक केल्या जाणार्‍या दैनंदिन उष्णतेच्या सूचनांवरुन पुढील 3-4 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यांचे आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि तळागाळातील कामगारांना उष्णतेबद्दल संवेदनशील बनवावे लागणार आहे, तसेच त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरु ठेवावे लागतील असेही केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी म्हटले आहे. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना तोंड देण्यासाठी आरोग्य विभागाला उष्णतेचे आजार, त्याचे लवकर निदान आणि व्यवस्थापन याबाबतची तयारी अधिक तीव्र करावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.


केंद्राचं राज्यांना काळजी घेण्याचं आवाहन 


देशात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना तोंड देण्यासाठी आरोग्य केंद्रामध्ये अत्यावश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून उष्णतेशी संबंधित आजारांवर 'राष्ट्रीय कृती योजना' तयार करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी आपल्या पत्रात उष्णतेच्या लाटेच्या प्रभावी व्यवस्थापनाबाबत सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक तत्त्वं जारी करावीत, अशी विनंती केली आहे. 1 मार्चपासून सर्व राज्य आणि जिल्ह्यांमध्ये एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाअंतर्गत (IDSP) उष्णतेशी संबंधित आजारांवर दैनंदिन निरीक्षण केलं जात आहे.