Agriculture Award : कृषी, क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज सन्मान होणार आहे. आज नाशिकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी  सन्मानित करण्यात येणार आहे. आजच्या या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात राज्यातील 198 शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देण्यात येणार आहेत. सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हसरुळ नाशिक याठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे. 


दरम्यान, आज होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हजेरी लावावी असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. या सोहळ्यासाठी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याबरोबरच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे अन्नव नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे,  महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ रोजगार हमी, फलोत्पादन संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे हे मंत्री  उपस्थित राहणार आहेत.  




आज 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे कृषी विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. त्यामुळे तीन वर्षाचा पुरस्कार प्रदान सोहळा आज संपन्न होणार आहे. कृषी, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्‍पादन- उत्‍पन्‍न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषी विस्‍तारामध्‍ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्‍यक्‍ती, संस्‍था, गट, अधिकारी कर्मचाऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्‍मानित करण्‍यात येणार आहे. 


 'या' पुरस्कारांनी शेतकऱ्यांचा होणार सन्मान


 डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्‍न पुरस्कार - 4 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 75 हजार रुपये)
 वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार - 28 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 50 हजार रुपये)
 जिजामाता कृषिभूषण पुरस्‍कार - 9 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी  50 हजार रुपये)
 कृषीभूषण (सेंद्रिय शेती) - 23 पुरस्‍कारार्थी (प्रत्येकी 50 हजार रुपये)
 वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार - 9 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 30 हजार रुपये)
 उद्यानपंडीत पुरस्‍कार - 25 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 25 हजार रुपये) 
 वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ  शेतकरी पुरस्‍कार - सर्वसाधारण गट - 57 पुरस्‍कारार्थी, आदिवासी गट - 18 पुरस्‍कारार्थी (प्रत्‍येकी 11 हजार रुपये)
राज्‍यस्‍तरीय पीकस्‍पर्धा- खरीप भात - 9 पुरस्‍कारार्थी, खरीप सोयाबीन 9 पुरस्‍कारार्थी - प्रत्‍येकी प्रथम क्रमांक - 10 हजार रुपये, व्दितीय क्रमांक- 7 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक 5 हजार रुपये
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्‍न पुरस्‍कार - 7 पुरस्‍कारार्थी