मुंबई : भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Uddhav Thackeray) मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात (Mumbai North Lok Sabha Election 2024) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जुना शिवसैनिक मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाकडे आल्यानंतर, उमेदवार म्हणून विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांच्या नावाची चर्चा आहे. पदाधिकाऱ्यांकडून या लोकसभा मतदारसंघातून विनोद घोसाळकर यांच्या नावाला पसंती आहे आणि त्यानुसार उमेदवारी जाहीर होण्याआधीच स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर प्रचार केला जातोय. 


मात्र अद्याप कुठल्याही प्रकारे उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून या लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेली नाही. अद्याप घोसाळकरांना सुद्धा तशा प्रकारचे आदेश शिवसेना ठाकरे गटाकडून मिळालेले नसल्याची माहिती आहे. पण विनोद घोसाळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळते आणि घोसाळकरांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


केंद्रीय मंत्र्याविरोधात विनोद घोसाळकरांना उमेदवारी...


उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो, याच मतदारसंघातून गोपाळ शेट्टी 10 वर्षांपासून खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र, यंदा त्यांना डावलून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उद्धव ठाकरेंना तगडा उमेदवार देण्याचे आव्हान आहे. असे असतानाच ठाकरेंकडून जुना शिवसैनिक म्हणून विनोद घोसाळकरांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. 


उत्तर मुंबई भाजपचा आणि गोपाळ शेट्टी यांचा बालेकिल्ला....


उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. तसेच, गोपल शेट्टी यांची या मतदारसंघात चांगली पकड आहे. गोपाल शेट्टी यांनी नगरसेवक असल्यापासून ते खासदार होईपर्यंत या मतदारसंघावर आपलं आणि भाजपचं वर्चस्व कायम ठेवले आहे. त्यामुळे विरोधकांना या मतदारसंघात सत्तापरिवर्तन करणं एवढे सोपं नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जर विनोद घोसळकर येथून रिंगणात उतरल्यास याठिकाणी यंदा तरी काही बदल होतो का? हे पाहणं महत्वाचे असेल. 


घोसाळकरांना सहानुभूती मिळेल? 


काही दिवसांपूर्वी विनोद घोसाळकरांचा मुलगा अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेचा देखील व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. अशात विनोद घोसाळकरांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यास त्यांना सहानभूती मिळू शकते. पण, प्रत्यक्षात विनोद घोसाळकर निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर लोकसभेच्या रिंगणात? मनसे नेत्यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण