मुंबई: शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला गुजरातमधील दमन या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. हा ट्रक पालघरमधील असून ट्रक मालकाने ट्रक चालकाची ओळख पटवली आहे. विनायक मेटे यांचा आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला होता, त्यातच त्यांचे निधन झाले. 


आज पहाटे विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात झाला होता, त्यानंतर या अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक चालकाने पोबारा केला होता. दरम्यान, या अपघाताचा तपास करण्यासाठी रायगड पोलिसांनी सहा टीम तयार केल्या होत्या. त्यानंतर या अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ट्रकची ओळख पटली होती. 


ज्या ट्रक बरोबर हा अपघात घडला तो ट्रक पालघर जिल्ह्यातील कासा येथील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या ट्रकचा नंबर DN 09 P 9404 असा असून हा ट्रक आयसर कंपनीचा असल्याची माहिती आहे. या ट्रक चालकाचे नाव उमेश यादव असं असल्याचं सांगितलं जातं. हा ट्रक ताब्यात घेण्यासाठी पालघर पोलीस गुजरातमधील वापी येथे रवाना झाले. त्यांनी ट्रकची ओळख पटविण्यासाठी ट्रक मालकाला सोबत घेतले आणि गुजरातमधून त्या ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. 


असा झाला अपघात
विनायक मेटे आज पहाटे बीडवरुन मुंबईला येत असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली. विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. मेटे यावेळी झोपेत होते, त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून याचा तपास सुरू केला होता. 


विनायक मेटे यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये रात्री आणले जाईल आणि त्यानंतर बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. उद्या अंतदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणलं जाईल. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे.