Maharashtra Cabinet : महाविकास आघाडी सरकारमध्ये निधी मिळत नाही, आमची कुचंबणा होत आहे असा थेट आरोप शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादी आणि विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर होत होता. एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह बंड करून भाजपच्या साथीत मुख्यमंत्रिपद मिळवले. मात्र, खातेवाटपात पूर्णत: देवेंद्र फडणवीस यांचाच बोलबाला राहिला आहे. त्यामुळे जी ओरड अजित पवारांविरोधात झाली, तीच ओरड आता शिंदे गटातील मंत्र्यांकडून जाहीरपणे नाही झाली, तरी अंतर्गत नक्की होतील, अशीच स्पष्ट चिन्हे आहेत. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग त्यांच्याकडे आहेत. 


नवाब मलिक, धनंजय मुंडेंकडील खाते एकनाथ शिंदेंकडे


एकनाथ शिंदेंकडे असलेल्या खात्यांमधील यापूर्वी परिवहन खाते हे अनिल परब यांच्याकडे होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य धनंजय मुंडे यांच्याकडे होते. अल्पसंख्याक व औकाफ हे नवाब मलिक पाहत होते. मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विजय वडेट्टीवार पाहत होते. सामान्य प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच होते. नगरविकास खाते एकनाथ शिंदे स्वत: पाहत होते. 


तब्बल 7 खात्याचे फडणवीस एकटे मालक 


खातेवाटपामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. यामधील राजशिष्टाचार खाते हे आदित्य ठाकरे यांच्याकडे होते. ते खाते फडणवीसांनी स्वत:कडे ठेवले आहे. 


मुंबईतून मंत्रिपद दिलेल्या भाजपने मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास खात्याचा कारभार दिला आहे. त्यामुळे आदित्य यांच्याकडील पर्यटन हे सुद्धा  खाते भाजप आपल्याकडे घेण्यात यशस्वी झाला आहे. याच खात्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा डोळा होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना शालेय शिक्षण व मराठी भाषा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


उदय सामंत ठरले नशीबवान 


महाविकास आघाडी सरकारमध्ये उदय सामंत यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचा पदभार होता. ते खातं आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे म्हणजेच भाजपकडे गेलं आहे. उदय सामंत उद्योग खात्यासाठी आग्रही होते. त्यांना ते मिळाल्याने ते यशस्वी ठरले आहेत. हेच खाते यापूर्वी सुभाष देसाईंकडे होते. 


दादा भुसेंकडील खाते अब्दुल सत्तारांकडे 


अब्दुल सत्तारांकडे राज्यमंत्री असताना त्यांच्याकडे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य खाते होते. आता कॅबिनेट मंत्री म्हणून दादा भुसेंकडील कृषी खाते त्यांच्याकडे आलं आहे. दादा भुसेंकडे बंदरे व खनिकर्म खात्याची जबाबदारी आली आहे. सुभाष देसाई या खात्याचा कारभार पाहत होते. 


शंभुराज देसाई आहे त्याच खात्यात प्रमोट 


उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे  गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन खात्याचा कारभार होता. आता त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्काचे कॅबिनेट मंत्रिपद आलं आहे.


दीपक केसरकर सपशेल तोंडावर पडले 


एकनाथ शिंदे प्रवक्ते गटाची जबाबदारी सांभाळत असलेल्या दीपक केसरकरांना कॅबिनेट संधी मिळाली. त्यानंतर ते पर्यटन आपल्याकडेच येणार अशा व्यूहरचनेमध्ये कामाला लागले होते. मात्र, त्यांना शालेय शिक्षण व मराठी भाषा देऊन बोळवण करण्यात आली आहे. हे खातं यापूर्वी वर्षा गायकवाड यांच्याकडे होते. प्रत्यक्षात हे खातं आता भाजपनं पळवलं आहे.


तानाजी सावंत


तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण देण्यात आले आहे. यापूर्वी, हे राष्ट्रवादीकडू राजेश टोपे यांच्याकडे होते. त्यांनी या पदाला न्याय देणारे काम कोविड काळात केले होते. 


संदीपान भुमरे


संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्पादन खातं होते तेच खाते देण्यात आलं आहे. 


संजय राठोड


अन्न व औषध प्रशासन खात्याची जबाबदारी संजय राठोड यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्याचा कारभार होता. 


गुलाबराव पाटील


गुलाबराव पाटील यांच्याकडेही आहे तेच पाणीपुरवठा व स्वच्छता खातं आलं आहे.  


त्यामुळे शिवसेना आणि प्रतिष्ठा पणाला लावलेल्या शिंदे गटाकडे मुख्यमंत्रिपद सोडल्यास काँग्रेस राष्ट्रवादीकडील दुय्यम खाती पदरात पडली आहेत. त्यामुळे निधी मिळत नाही हा आरोप अजित पवारांवर झाला तो आता फडणवीसांवर होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे



  • राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

  • सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

  • चंद्रकांत पाटील-  उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

  • डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

  • गिरीष महाजन-  ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 

  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता 

  • दादा भुसे- बंदरे व खनिकर्म 

  • संजय राठोड-  अन्न व औषध प्रशासन

  • सुरेश खाडे- कामगार

  • संदीपान भुमरे-  रोजगार हमी योजना व फलोत्पादन

  • उदय सामंत- उद्योग

  • प्रा.तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

  • रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

  • अब्दुल सत्तार- कृषी

  • दीपक केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा

  • अतुल सावे-  सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

  • शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

  • मंगलप्रभात लोढा-  पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास