Latur News Update : पुरोगामी महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख. पण पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एकविसाव्या शतकात जगत असलेल्या आपण अजूनही जाती पातींच्या चिखलात रुतलोय की काय अशी शंका येणारी ही घटना आहे. लातूरच्या ताडमुगळी गावातील संपूर्ण मागासवर्गीय समाजावर बहिष्कार घालण्यात आला आहे. मागासवर्गीय असलेल्या या कुटुंबातील तरुणानं गावच्या देवळात नारळ फोडला म्हणून बहिष्कार घातला होता. तसंच हा बहिष्कार मोडणाऱ्यालाही दंड ठोठावण्याचं घोषित केलं होतं. तीन दिवसांपासून हा बहिष्कार होता. अखेरीस पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी गावात जाऊन चर्चा केली. आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.


ताडमुगळी हे काही हजार लोकसंख्येचे गाव. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात हे गाव आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाच्या जवळ असलेलं हे गाव तसं खूप शांत आहे. मात्र तीन दिवसांपूर्वी गावातील एका मागासवर्गीय समाजातील तरुण मुलाने देवळात जाऊन नारळ फोडला आणि गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.


तीन दिवसांपूर्वी हा तरुण गावातील मंदिरात गेला. देवाच्या पाया पडत त्याने नारळ फोडला. यामुळं गावात दोन समाजात तेढ निर्माण झाली. यानंतर गावातील मागासवर्गीय यात बहिष्कार टाकण्यात आला. समाजातील लोकांचा गावकीत सहभाग नको, किराणा, दळण बंद, शेतातील मजूरीसाठी बोलावणे बंद केले.  जर गावातील कोणी बहिष्काराचा नियम मोडला तर त्यास मोठा आर्थिक दंड लावण्यात येईल असे सांगण्यात आले. दोन दिवसात याची चर्चा पोलिसांपर्यंत गेली. औराद शहाजानी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गावात सर्वप्रथम पोलिस बंदोबस्त लावला आणि सर्वांशी चर्चा करत प्रकरण मिटवले आहे.


पोलिसांनी प्रकरण मिटवलं असलं तरी आता मागासवर्गीय समाजातील काही संघटना मात्र आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणातील संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडत राहतात हे फार विदारक चित्र आहे. 


बहिष्कार टाकणाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा- सचिन खरात


लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात मंदिरात जाण्यावरून मागासवर्गीय बांधवांना वाळीत टाकून त्यांना कोणी मदत करेल त्याला 40000 हजार रुपये दंड असल्याचे सोशल मीडियात असा व्हिडीओ दिसत आहे. हे अत्यंत निषेधार्थ आहे. महाराष्ट्र राज्य हे राज्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे तरीसुद्धा अशा घटना वाढताना दिसत आहे त्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी करून अशा समाजकंटाकावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.




IVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha