लखनौ : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत गोरखपूरची लढत सर्वात रंगतदार आणि हायप्रोफाईल होणार असल्याचं स्पष्ट झालंय. सपचे नेते अखिलेश यादव यांच्या वहिनींनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता अखिलेश यादवांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गोरखपूर मधील राजकीय उत्तराधिकारी आणि दिवंगत नेते उपेंद्र शुक्ला यांच्याच पत्नीला समाजवादी पक्षाकडून तिकीट देण्यात आलं आहे. तसेच भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद  देखील गोरखपूरच्या राजकीय रिंगणात उतरले आहेत. 


उपेंद्र शुक्ला हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जायचे. पण त्यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं. आता त्यांच्याच पत्नीला समाजवादी पक्षाने तिकीट दिलं आहे, तेही चक्क मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच विरोधात. भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे देखील गोरखपूरमधून लढणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याची चर्चा आहे.


योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर गोरखपूर लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी याच उपेंद्र शुक्ला यांना मिळाली होती. पण ते पराभूत झाले होते. 


अखिलेश यादव यांच्या वहिनींचा भाजप प्रवेश
दरम्यान, समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या घरात मोठी फूट पडलीय. मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाईंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुलायम यांचे पुत्र प्रतीक यादव यांच्या पत्नी अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अपर्णा यादव यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 


मात्र त्यानंतर पुन्हा मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यांची स्तुती करून अपर्णा यांनी आपण कुटुंबासोबतच असल्याचे दाखवले होते. समाजवादाचे दुसरे नाव हे अखिलेश असल्याचे जाहीरपणे सांगत त्यांनी पक्षासोबत राहणार असल्याचा संदेश दिला होता. मात्र आता अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप फोडणाऱ्या अखिलेश यादव यांना भाजपने त्यांच्या घरातूनच मोठा दणका दिल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :