Virar Hospital Fire LIVE : विरारमधील रुग्णालयातील आगीत 14 जणांचा मृत्यू, दुसऱ्या रुग्णालयात नेताना एका रुग्णाने जीव गमावला

Maharashtra Virar Vijay Vallabh Hospital Fire Live Updates : विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग लागल्याने 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विरार रुग्णालयातील घटना ही अतिशय दुर्दैवी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Apr 2021 09:19 AM
विरारमधील रुग्णालयातील आगीत 14 जणांचा मृत्यू, दुसऱ्या रुग्णालयात नेताना जीव गमावला

विरारमधील विजय वल्लभ कोविड रुग्णालयातील मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. यातील 13 जणांचा मृत्यू आयसीयूमध्ये लागलेल्या आगीतच झाला. मात्र शिवाजी वीरकर यांचा मृत्यू दुसऱ्या रुग्णालयात नेताना झाला. "दोन दिवसांपासून ते आयसीयूमध्ये होते. परंतु आगीत ते 80 टक्के भाजले होते. जनसेवा रुग्णालयात नेलं पण व्हेंटिलेटर नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात घेऊ शकत नाही. त्यानंतर आणखी एका रुग्णालयात नेल्यानंतर तिथेच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं," अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली.

आगीत पतीचा मृत्यू झाल्याचं समजल्यावर पत्नीला हृदयविकाराचा झटका, दोशी दाम्पत्याचा दुर्दैवी अंत

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आगीत कुमार दोशी यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूची बातमी समजताच पत्नी चांदनी यांनाही हृदयविकाराचा झटका आला. या घटनेत दोशी दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला.

विरार दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी दोन लाखांची मदत, पंतप्रधान कार्यालयाची माहिती

विरार येथे रुग्णालयाला आग लागल्याने 13 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून मृतांना प्रत्येकी दोन लाखांची मदत तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आली आहे.


 

विरार आग दुर्घटना: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं दुःख 

विरार येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून काही करोना रुग्णांचा मृत्यु झाल्याचे वृत्त समजून व्यथित झालो. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपल्या तीव्र शोकसंवेदना कळवतो व जखमी रुग्णांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.  

मुख्यमंत्र्यांची घोषणा: विरार रुग्णालय आगीतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमींना 1 लाख

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे

विरार दुर्घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचा आदेश

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातीळ अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश  दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले असून त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत

पार्श्वभूमी

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू 
नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे 24 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. 


मध्यरात्री साडेतीन वाजता विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली. हे कोविड रुग्णालय असून या रुग्णालयात एकूण 39 रुग्ण उपचार घेत होते. प्राथमिक माहितीनुसार, अतिदक्षता विभागातील एसी कॉम्प्रेसरला आग लागली. या आगीत एकूण 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर इतर रुग्णांना वसई-विरारमधील इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. 


विरार रुग्णालयातील घटना ही अतिशय दुर्दैवी: आरोग्यमंत्री राजेश टोपे


राज्यातील रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटना सुरूच असून आता विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे अशी भावना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. 


आरोग्यमंत्री राजेश टोपे या घटनेवर बोलताना म्हणाले की, "प्राथमिक स्तरावर पाहता ही दुर्घटना असल्याचं समजतंय. अचानकपणे एसीचा स्फोट झाल्याने केवळ दोन ते तीन मिनीटात सर्वत्र धुर पसरला. त्यामुळे रुग्णांना वाचवायला वेळ कमी मिळाला. दरवाज्याच्या जवळील चार रुग्णांना वाचवण्यात यश आलं आहे."


हा स्फोट का झाला. कसा झाला याची चौकशी करण्यात येईल असं सांगत राजेश टोपे म्हणाले की, "या घटनेवर शासनस्तरावर योग्य ती मदत केली जाईल. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने दवाखान्यांना हातही लावता येत नाहीत. पण फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडिटचे आदेश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहेत."


 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.