सोलापूर : संभाजी भिडे गुरूजींनी (Sambhaji Bhide Guruji) वटसावित्रीच्या पुजेवेळच्या महिलांच्या पेहरावावरून केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. त्यातच आता सोलापुरातल्या महिला संघटनेने त्यांना इशारा दिला आहे. संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू असा इशारा सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वूमन्स (WOW) या महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिला आहे. 


वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, त्या ठिकाणी फक्त साडी घातलेल्या महिलांनी जावं अशा प्रकारचं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यावरून सोलापुरातील महिला संघटना आक्रमक झाली आहे.  


संभाजी भिडेंच्या धोतरावर बोलावं लागेल


संभाजी भिडे यांना इशारा देताना विद्या लोलगे म्हणाल्या की, भिडे गुरुजी यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये, हे आता जास्त होत असून आता ऐकवलं जातं नाही. आम्ही काय करायचं आणि काय करू नये हे सांगणारे भिडे गुरुजी हे कोण आहेत? ते आमचं घर चालवत नाहीत. यापुढे त्यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्यांचे पेहराव असणाऱ्या धोतरावर आम्ही बोलू शकतो. त्यांनी वाढवलेल्या मिशाही आम्हाला कापाव्या लागतील.


काय म्हणाले होते संभाजी भिडे?


संभाजी भिडेंनी पुण्यातील जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतलं आणि त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना संबोधन करताना महिलांबाबत वक्तव्य केलं. ते म्हणाले की, वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, त्या ठिकाणी फक्त साडी घातलेल्या महिलांनी जावं.


आपल्या जे स्वातंत्र्य मिळाला ते हांडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री आहे, हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वतंत्र आहे असं वक्तव्यही संभाजी भिडे यांनी केलं होतं. 


वारीत कायदा-सुव्यवस्था राखेल याची काळजी घ्या, संभाजी भिडेंना पुणे पोलिसांची नोटीस


संभाजी भिडे यांना पुणे पोलिसांनी नोटीस धाडली असून तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनावेळी कायदा-सुव्यवस्था राखेल याची काळजी घ्या असं त्यामध्ये म्हटलं आहे. याआधी संभाजी भिडे आणि समर्थकांनी वारीत शस्त्रे आणली होती. वारीत शस्त्रे आणल्याने आणि तेढ निर्माण करणाऱ्या भाषणावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे यंदाच्या वारीत असं काही घडू नये म्हणून पुणे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना नोटीस धाडली आहे. 


ही बातमी वाचा: