Nagpur News नागपूर लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम संपला आहे. आता पुढच्या दोन ते तीन महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच नागपुरातील दक्षिण-पश्चिम नागपूर म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात मोठे बदल करण्यात आले आहे. यात सर्व बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. तसेच संयोजकांनाही पदावरून दूर करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर आगामी दिवसात लवकरच नवीन बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्रप्रमुख जाहीर केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.  


गटबाजी केल्यास कठोर कारवाई, भाजपचा पदाधिकाऱ्यांना तंबी वजा इशारा


दक्षिण-पश्चिम नागपूर या विधानसभा क्षेत्रासंदर्भात भाजपची एक महत्त्वाची बैठक काल पार पडली. त्यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गटबाजी करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल अशी तंबी वजा इशारा ही देण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला नागपूरसह विदर्भात अपेक्षेप्रमाणे यश न आल्याने भाजप आता सावध पवित्रा घेत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे.  


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील हालचालींना वेग 


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे आघाडी मिळाली नव्हती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा केवळ एक लाख 37 हजार मतांनी विजय झाला असला तरी भाजपला जास्त मताधिक्याची अपेक्षा होती. नुकतेच पश्चिम विधानसभा  मतदारसंघात पक्षातील बुथ प्रमुख आणि शक्ती प्रमुखांना पदावरून दूर करण्यात आलं होतं आणि नवीन व्ह्यू रचना रचल्या जाईल, असे सांगण्यात आलं होतं. अशातच काल दक्षिण पश्चिम जो मतदारसंघ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असून, या मतदारसंघात देखील असेच फेरबदल करण्यात आले आहे. 


पक्षातील सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि काही संयोजक यांना पदावरून दूर होण्यास सांगितले आहे. तर आगामी काळात लवकरच त्यातील रचनात्मक बदल करण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचे  समोर आले होते. त्याच अनुषंगाने भाजप पक्षाने देखील सावध पवित्रा घेतलेला आहे. भाजप पक्षात जर कोणी गटबाजी केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे देखील पक्षाकडून सांगण्यात आला आहे.


हे ही वाचा