पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा घेतल्यानंतर विधानपरिषद निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी संधी नसताना तिसरा उमेदवार उतरवल्याने महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे हट्ट करतात का? अशी चर्चा राजकीय वर्तुळाता रंगली आहे. या संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. 



लोकांसमोर सामूहिकपणे जात असताना तडजोड करायच्या असतात


आज पुण्यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित करणाऱ्या वार्तालापमध्ये शरद पवार यांनी विविध प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. त्याचबरोबर जोरदार राजकीय फटकेबाजी सुद्धा केली. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा घेऊन जास्त उमेदवार निवडून आणण्यात यश आलं नाही. विधानपरिषदेला सुद्धा उमेदवार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये  हट्ट करतात का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी उत्तर दिले.  शरद पवार म्हणाले की, थोडा स्वभाव असतो एखाद्याचा. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या हिताच्या दृष्टीने आग्रही भूमिका घेत असतात. थोडं अडजेस्ट करावं लागतं. लोकांसमोर सामूहिकपणे जात असताना तडजोड करायच्या असतात. मात्र, त्यामुळे आम्ही अस्वस्थ होत नाही.


मविआत नेतृत्वावरून संघर्ष नाही


जयंत पाटलांना विधानपरिषदेत उमेदवारी दिली असताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला. त्यामुळे मविआमध्ये नेतृत्वावरून संघर्ष आहे का असे विचारण्यात आलं असता शरद पवारांनी अजिबात नसल्याचे सांगितले. तसेच निवडणुकीत आमचा उमेदवार नव्हता, तर जयंत पाटलांना आमची मते देऊ असे सांगितले होते. दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवरून सुद्धा आम्ही चर्चा केली होती, असे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या