विधानपरिषद निवडणूक बिनविरोध
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2016 08:14 AM (IST)
मुंबई : दावे-प्रतिदावे आणि कुरघोडीच्या राजकारणानंतर अखेर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे. कारण भाजपचे प्रसाद लाड आणि अपक्ष अर्ज भरलेले भाजप नेते मनोज कोटक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी दहाच उमेदवार राहिले. यामध्ये भाजपचे 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसचा एक उमेदवार आहे. हे उमेदवार आता आमदार म्हणून विधानपरिषदेत जातील. भाजपचे आमदार यामध्ये भाजपकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, शिवसंग्राम नेते विनायक मेटे, प्रवीण दरेकर, आर एन सिंह आणि सुजीतसिंह ठाकूर यांचा समावेश होता. शिवसेनेचे आमदार विधानपरिषदत निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते आता बिनविरोध निवडून जातील. काँग्रेसकडून नारायण राणे, राष्ट्रवादीकडून मुंडे काँग्रेसने ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना विधानपरिषदेत पाठवण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याच गळ्यात विधानपरिषदेची माळ पडली आहे. ट्विस्ट संपला या 10 जागांसाठी 11 जूनला मतदान होणार होतं, त्यासाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या निवडणुकीत ट्विस्ट आला होता. अखेर आज हा ट्विस्ट संपला आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी सहा नावं जाहीर केली होती. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, शिवसंग्राम नेते विनायक मेटे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आर एन सिंह आणि सुजीतसिंह ठाकूर यांचा समावेश होता. त्यापैकी प्रसाद लाड यांना अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. प्रसाद लाड हे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत दाखल झाले . त्यामुळे बाहेरुन आलेल्या लाड यांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपमध्ये नाराजी होती. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठकाही झाल्या. अपक्ष मनोज कोटकांचा अर्जही मागे या निवडणुकीसाठी भाजप नेते मनोज कोटक यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मनोज कोटक यांच्या अर्जामुळे विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट आला होता. कारण 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यापैकी प्रसाद लाड यांनी माघार घेतल्यामुळे आता 11 उमेदवार राहिले. त्यानंतर कोटकांनीही आपला अर्ज मागे घेतला. विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणारे आमदार (07/07/2016) 1) दीप्ती चवधरी – काँग्रेस 2) सुभाष देसाई – शिवसेना 3) मुझफ्फर हुसेन – काँग्रेस 4) रामराजे नाईक निंबाळकर – राष्ट्रवादी काँग्रेस 5) शोभाताई फडणवीस – भाजप 6) प्रकाश बिनसाळे – राष्ट्रवादी काँग्रेस 7) धनंजय मुंडे – राष्ट्रवादी काँग्रेस 8) विनायक मेटे – शिवसंग्राम 9) दिवाकर रावते – शिवसेना 10) विजय सावंत – अपक्ष