कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील शेतकरी सचिन पाटोळे हे मिरचीची शेती करतात. दहावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर सचिन यांनी वडिलोपार्जित शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली. १० एकरापैकी ८ एकरात ऊसाचं पीक घेतलं जात होतं. त्यांनी ऊसाला फाटा देत भाजीपाला पिकाकडं वळण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षापासून सचिन या जमिनीत आलटून पालटून टोमॅटो, वांगी, मिरची, फ्लॉवर, कोबी अशी पिकं घेत आहेत. यंदाही त्यांनी इथल्या ७० गुंठे जमिनीत मिरचीची लागवड केली आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यात सचिन यांनी या जमिनीत मेढ्याचे कळप बसवले. आणि त्यानंतर जमीन चांगली नांगरुन घेतली. रोटाव्हेटरच्या मदतीनं साडे चार फुटांच्या सरी पाडल्या. रासायनिक खतांच्या बेसल डोस दिला. त्यावर ठिबकच्या लॅटरल आणि ३० मायक्रॉनचा मल्चिंग पेपर अंथरला. फेब्रुवारी महिन्यात ३५ गुंठ्यात व्हीएनआर ३३२ आणि ३५ गुंठ्यात व्हीएनआर १०९ या जातीच्या मिरचीच्या रोपांची लागवड केली. ७० गुंठ्यासाठी त्यांनी मिरचीची १५ हजार ५०० रोपं लागली.
लागवडीनंतर किडनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्य़ा घेतल्या. दर २१ दिवसांनी ठिबकमधून विद्राव्य खतं दिली. रोपं ३० दिवसांची झाली असतांना त्यांना तारकाठीच्या मदतीनं आधार दिली. लागवडीनंतर ३०व्या दिवशी फुलकळी दिसू लागली तर ४५ व्या दिवशी मिरची तोडणीस तयार झाली.
*आतापर्यंत या ७० गुंठ्यातून ३५ टन मिरचीचं उत्पादन मिळालं आहे
* सचिन ही मिरची जयसिंगपूर, कुरुंदवाड आणि सांगलीच्या बाजारात ५० ते ७५ रुपये किलोप्रमाणे विक्री करतात
*यातून त्यांना अंदाजे १७ लाख ५० हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.
*यातून रोपं, ठिबक, खतं, किडनाशकं, मजुरी, वाहतूक असा साडे चार लाखांचा खर्च वजा जाता त्यांना १३ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे.
*अजून या प्लॉटमधून २० टन मिरचीच्या उत्पादनाची अपेक्षा असून यातून खर्च वजा जाता ७ लाखांचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.
*म्हणजेच या ७० गुंठ्याच्या प्लॉटमधून यंदा त्यांना २० लाखांचं निव्वळ उत्पन्न मिळेल
आपल्याकडील पोषक वातावरण आणि बाजाराची मागणी ओळखून सचिन यांनी ऊसाला भाजीपाल्याचा पर्याय दिला, पाण्याच्या बचतीसाठी ठिबकचा वापर केला. ज्यामुळं त्यांना कमी कालावधीत अपेक्षित नफा मिळाला आहे.
व्हिडीओ
चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर