मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसमध्ये साटंलोटं पाहायला मिळालं. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत कोल्हापूर, धुळे आणि मुंबईत बिनविरोध निवड करण्यावर एकमत झालं. त्यानुसार कोल्हापूरात भाजपच्या अमल महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. तर त्याबदल्यात धुळ्यात काँग्रेस उमेदवारानं माघार घेतल्यानं भाजपच्या अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
याशिवाय मुंबईत काँग्रेसनं उमेदवार न दिल्यानं भाजपच्या राजहंस सिंह यांचा विधान परिषदेत जाण्याचा मार्गही सुकर झाला. याशिवाय शिवसेनेचे सुनील शिंदे यांचीही निवड निश्चित झाली. विशेष म्हणजे कोल्हापूरात महाडिक आणि पाटील या कट्टर विरोधकांत सामना होणार होता. पण दिल्लीतून सकाळी फोन आला आणि सूत्रं फिरली. महाडिक कुटुंबीयांची बैठक झाल्यानंतर अमल महाडिक यांनी अर्ज मागे घेतला.
कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने सतेज पाटील दुसऱ्यांदा विधान परिषदेचे आमदार झाले आहेत. यावेळी सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे आभार मानले. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांचे देखील आभार सतेज पाटील यांनी मानले. राजकीय निवडणुका या वैयक्तिक पातळीवर होऊ नयेत, असंही यावेळी सतेज पाटील यांनी बोलून दाखवले. तर सतेज पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी महाडिक कुटुंबीयांनी उमेदवारी अर्ज घेताना पक्षाचा आदेश म्हणून निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले. जिल्ह्यावर महाडिक कुटुंबीयांचे वर्चस्व होते आणि यापुढे देखील राहील असं धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवलं. जिल्ह्यात सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे अशा पद्धतीचे संकेत देखील महाडीक कुटुंबीयांनी दिले आहेत. सतेज पाटील यांची निवड झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी महाडिक कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली.
Kolhapur : राजकीय निवडणुका या वैयक्तिक पातळीवर होऊ नये : सतेज पाटील
इतर महत्त्वाच्या बातम्या :
ST strike Updates 11 हजार एसटी कर्मचारी कामावर परतले; महामंडळाची माहिती
Nanded : नांदेड हे गांजा तस्करीचे केंद्र; मराठवाडा आणि इतर भागात वितरण होत असल्याचं स्पष्ट
कोरोनाच्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'मुळे जगभरात खळबळ; जाणून घ्या विषाणूबाबत प्रमुख मुद्दे