ST workers Strike Updates : वेतन वाढीची घोषणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन सरकार आणि एसटी महामंडळाने केले होते. शुक्रवारी 26 नोव्हेंबर रोजी 11 हजार 549 कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. वेतन वाढीच्या घोषणेनंतरही एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्दावर ठाम आहे. तर, दुसरीकडे महामंडळाने कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. 


अनेक दिवसानंतर महाराष्ट्राची लालपरी एसटी बसेस तुरळक प्रमाणात धावू लागल्या. यावेळी काही आगारांमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. एसटी पुन्हा धावू लागल्याने सामान्य प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. 


एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या प्रशासकीय आणि कार्यशाळेतील कर्मचारी बऱ्यापैकी कामावर रुजू झाले आहेत. प्रशासकीय विभागात कार्यरत असणाऱ्या 9426 कर्मचाऱ्यांपैकी 6973 कर्मचारी उपस्थित होते. तर, दुसरीकडे कार्यशाळेतील 17 हजार 560 पैकी 3549 कर्मचारी हजर होते. महामंडळातील 37 हजार 225 चालकांपैकी 594 आणि  28 हजार 55 वाहकांपैकी 433 वाहक कामावर परतले आहेत. एसटीतील एकूण 92 हजार 266 कर्मचाऱ्यांपैकी फक्त 11 हजार 549 जणच कामावर रुजू झाले आहेत. तर, तब्बल 80 हजार 717 अजूनही कामावर रुजू झाले नाहीत. 


परिवहन मंत्र्यांचा कारवाईचा इशारा


औद्योगिक न्यायलयाने संप बेकायदेशीर ठरवल्यास एसटी महामंडळाच्या तरतुदीनुसार, एक दिवसाच्या संपासाठी आठ दिवसांचा पगार कापण्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लवकर कामावर रुजू व्हावे, कारवाई करण्यास महामंडळाला भाग पाडू नये असे आवाहन अनिल परब यांनी केले. एसटीचे होणारे नुकसान हे राज्याचे आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान असल्याचे त्यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ आणि पगार वेळेवर व्हावा यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे नोकरीच्या शाश्वतीची मागणी सरकारने मान्य केली असल्याचे परब यांनी सांगितले. निलंबनाची कारवाई झालेले कर्मचारी आज सायंकाळपर्यंत कामावर पुन्हा रुजू झाल्यास त्यांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


ST Workers Strike एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास अटकाव केल्यास कारवाई; परब यांचा इशारा


ST Strike : कर्मचारी विलिनीकरणावर ठाम; एसटी कामगार संघटना कृती समितीची अनिल परब यांच्यासोबत बैठक होणार


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA