जालना : येथील घनसावंगी येथे शुक्रवारी (26 नोव्हेंबर) सकाळी 11 च्या सुमारास एक भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर येत आहे. मृत्यू पावलेले तिघेही जण विद्यार्थी असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये दोन तरुणींसह एका तरुणाचा देखील समावेश आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील अंबर रोडवर हा भीषण अपघात घडला. या ठिकाणी शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास विद्यार्थी असलेली एक कार घनसावंगी येथील पेट्रोल पंपासमोरुन जात होती. याचवेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीला (स्कूटी) वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे गाडी रस्त्यालगतचं पलटली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील आणखी एका व्यक्तीला जबर मार लागल्याने त्याला जालना येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. अपघातात गाडीचे संपूर्णपणे नुकसान झाले असून घटनास्थळी पोलिसांनी पोहचून मदतकार्य केले आहे.


विद्यार्थ्यांवर काळाचा घाला


अपघातात मृत्यू पावलेले तिघेही विद्यार्थी आहेत. आरती मिरकर (वय 25) सुनील जाधव (वय 30) आणि वंदना राजगुरू (वय 24) असं या तिघांचं नाव आहे. शिक्षण घेत असलेले हे तिघेही टायपिंगची परीक्षा देण्यासाठी निघाले होते. पण परीक्षा देण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.  



इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha