मुंबई: राज्यसभेपाठोपाठ आता राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही रंगत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विधान परिषदेसाठी भाजपा सहावा उमेदवार देणार आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सहावा उमेदवार उद्याच अर्ज भरणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपकडून सहाव्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत असून उद्याच ते अर्ज भरणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. 


गुरुवारी भाजपच्या उमा खापरे या पाचव्या उमेदवारासह सहावा पुरुष उमेदवार अर्ज भरणार आहे. गुप्त मतदानाच्या आधारावर सहा उमेदवार निवडून आणण्याचा भाजपकडून दावा केला जातोय. भाजपकडून सहाव्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत असून उद्या हर्षवर्धन पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा महाविकास आघाडीतील मतं मिळवण्यासाठी फायदा होईल असा भाजपला विश्वास आहे.


भाजपने आज आपली उमेदवार यादी जाहीर केली असून यात प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना संधी दिली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, चित्रा वाघ, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे तसेच रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत यांना डावलले आहे. त्यानंतर विनायक मेटेंनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं काय असा सवाल त्यांनी केला आहे.


आता सहाव्या उमेदवाराच्या रुपात हर्षवर्धन पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 


विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय?



  • विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 28 मतांची आवश्यकता आहे. 

  • भाजप आणि मित्रपक्ष यांचं संख्याबळ 112 इतकं आहे.

  • त्यामुळे भाजपच्या 4 जागा सहज निवडून येऊ शकतात.

  • महाविकास आघाडीकडे 169 संख्याबळ आहे.

  • त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. तर मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.