औरंगाबाद:  भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे आज भारतावर नामुष्कीची वेळा आली असून तिकडे अरब राष्ट्रांमध्ये आपल्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावण्यात आलाय अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही असंही ते म्हणाले. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.


उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजपचे प्रवक्ते सध्या वेगळ्याच मुद्द्यांवर बोलत आहेत. त्यांना काय गरज होती पैगंबर यांच्यावर बोलायची? जसे आपले देव-देवता आपल्यासाठी प्रिय, तसे त्यांचे देव हे त्यांना प्रिय. कोणत्याही धर्माचा का तिरस्कार करायचा. पण भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांनी पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आणि भारताची नामुष्की झाली. पश्चिम आशियामध्ये आज भारताचा निषेध केला जात असून तिकडच्या कचराकुंडीवर पंतप्रधानांचा फोटो लावला जातोय. भाजपच्या प्रवक्त्यांमुळे भारतावर आज नामुष्की ओढावली. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाहीत."


कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र आणि हिदुस्थान?
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की,"भाजपच्या वाचाळवीर प्रवक्त्यांनी आज आमच्या कुटुंबियांवर टीका केली. त्यांच्यामुळेच देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नामुष्की होत आहे. त्यांच्यामुळेच आज ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवणार आहात हिंदुस्थान माझा असा सवाल भाजपला विचारायला हवं."


आमच्या हिंदुत्वाची मोजमापी करू नका, हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


मित्र होते ते हाडवैरी झाले
अडीच वर्षे झाल्यानंतरही हे सरकार कोसळत नाही, त्यामुळे विरोधक अस्वस्थ झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेली 25 वर्षे जे मांडीवर बसले होते, ते आता उरावर बसले आहेत. तर ज्यांच्याशी 25 वर्षे लढलो, त्यांनी मानसन्मान दिला. आता रोज सरकार पडण्याची हे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळेच मी परत येणार अशी वक्तव्य केली जातात. भाजप सुपारी देऊन भोंगा वाजवते, हनुमान चालीसा पठण करुन घेतं.