औरंगाबाद: मला अनेकजण विचारतात, की औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार? नाव काय हो ते कधीही बदलू शकतो पण मला सर्व सोईंनी परिपूर्ण असं संभाजीनगर करायचं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्या आधी आम्ही इथल्या विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं केलं, तसा प्रस्ताव केंद्राकडे दिला पण केंद्राने तो अडवून ठेवला असंही ते म्हणाले. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "औरंगाबादचे नाव हे संभाजीनगर असं करा असं म्हणत माझ्यावर टीका केली जाते. पण बाळासाहेबांनीच याचं नाव संभाजीनगर केलं आहे. संभाजीनगरच्या नामांतरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आहे. पण इथल्या विमानतळाला आम्ही छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नाव देण्याचा प्रस्ताव पारित केला आणि तो केंद्राकडे पाठवला. पण केंद्राने तो अडवून ठेवला."
उद्धव ठाकरे म्हणाले की, "हिंदुत्व आपला श्वास ह्याच मैदानात शिवसेनाप्रमुख बोलले. पहिल्यांदा पाणी प्रश्नावर बोलणार कुठेही फसवेगिरी नाही. हा प्रश्न बिकट होता. आता सुधारणा झाली की नाही? जुनी योजना हातात दंडा घ्या आणि पहिले संभाजिनगरला पाणी द्या. जुन्या योजनेसाठी समांतर योजनेला पैसे देणार. कोरोनात वर्ष गेली. पण आता किंमती वाढल्या खर्च वाढणार पण शासनाने याची जबाबदारी घेतली. कंत्राटदार अडून बसला तर सरळ तुरूंगात टाका. काल सुध्दा वाईल्ड लाईफ बोर्डाची बैठक घेतले हे तुमच्या सरकारने घेतले. आक्रोश मोर्चा सत्ता गेली म्हणून पाण्यासाठी नाही. तुम्ही किती पैसे दिले तेव्हा. आम्हाला खोट बोलणे शिकवलेले नाही. रस्त्यासाठी निधी दिलेला आहे. कामाला हात घायलाय सुधारताहेत. छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण, म्युझियम, अगदी मेट्रोसाठी पण गरज पडली तर मेट्रो करु विध्दवंसक नाही शहराची शान वाढवणारे काम आपण करु हे वचन."
मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.