Vidarbha Unseasonal Rain : महाराष्ट्रातील बहुतांश भागातील शेती ही पावसावरच अवलंबून असते. म्हणून पेरणी करण्याआधी शेतकरी पावसाची आतुरतने वाट पाहात असतो. विदर्भात मात्र शेतकरी पाऊस जाण्याची वाट पाहतोय. कारण अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचं नुकसान तर केलं आहेच. पण यंदाच्या हंगामात कापसाची लागवड कशी कशी करायची असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. ढगाळ वातावरण आणि ओली झालेली माती कापसाच्या लागवडीला मारक ठरण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत.
कपाशीची लागवड कशी करायची हा प्रश्न
विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतीची ही अशी दैना केली आणि कापसाच्या पेरणीसाठी सज्ज झालेला शेतकरी या जमिनीकडे हताश नजरेने बघत बसलाय. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात अवकाळी पावसाने फेर धरला आणि हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या भाजीपिकांचं आणि संत्र्यांच्या बागांचं नुकसान झालेलं असतानाच, शेतीतील माती अजूनही ओलीच आहे. येत्या काळात पावसाने उसंत घेतली नाही तर जून महिन्यात कपाशीची लागवड कशी करायची अशा गहन प्रश्नात शेतकरी अडकलाय.
पावसाने उघडीप देणं गरजेचं (Vidarbha Unseasonal Rain)
विदर्भात साधारणतः अक्षय तृतीय नंतर कापसाच्या पेरणीला सुरुवात होते. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जमीन ही अजूनही ओलीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर पावसाने उघड दिली नाही तर ओल्या जमिनीमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कपाशीच्या पिकाला धोका निर्माण होईल. त्यामुळे येणाऱ्या महिन्यात पावसाने उघड देणे जरुरी असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल
विदर्भात कपाशीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. दरवर्षी अक्षय्य तृतीयेनंतर कपाशीच्या पेरणीला सुरूवात होते. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. महत्त्वाचं म्हणजे अवकाळी आणि ढगाळ वातावरणात तापमानाचा पाराही 40 अंशांच्या वर जात नसल्याने मातीचा ओलावाही कमी होत नाही. अशा वातावरणात कपाशीची पेरणी केली तर येणारी पिकं बुरशीजन्य रोगांच्या विळख्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे बियाणे आणि खतं घेऊन पेरणीच्या तयारीत असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.
एरवी पेरणी झाल्यावर शेतकरी पावसाची वाट पाहत असतो. विदर्भातला शेतकरी मात्र पेरणीआधी पाऊस थांबण्यासाठी आभाळाकडे डोळे लावून बसल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
ही बातमी वाचा: