Maharashtra Buldhana News Updates: विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Farmers) यावर्षी चांगलेच संकटात सापडले आहेत. याच कारण आहे 'येलो मोझाक'. सोयाबीन पिकावर ऐन मोक्याच्या काळात येलो मोझेक या व्हायरसनं (Soybean Yellow Mosaic Virus) आक्रमण केल्यानं वर्धा (Wardha), अमरावती (Amravati), अकोला (Akola), वाशिम (Washim), यवतमाळ (Yavatmal) आणि बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादन 40 ते 45 टक्के घटण्याची भीती निर्माण झाली आहे. तर कापसावर ही मर रोगाचा (Fusarium Wilt) प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी विवंचनेत सापडले आहेत.


यंदाच्या वर्षी विदर्भातील अनेक जिल्ह्यात पिकांना पोषक पाऊस पडल्यानं विदर्भातील जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या प्रमुख सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आनंदात होते. मात्र एन महत्त्वाच्या म्हणजे, उत्पादन सुरू होण्याच्या दिवसांतच या दोन्ही पिकांवर रोगाचं आक्रमण झाल्यानं आता शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. नेमकं कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालंय? जाणून घेऊयात सविस्तर... 



  • बुलढाणा : सोयाबीन - 20000 हेक्टर तर कापूस 150 हेक्टर 

  • अकोला : सोयाबीन - 200 हेक्टर तर कापूस - 160 हेक्टर

  • वाशिम : सोयाबीन -250 हेक्टर तर कापूस - 100 हेक्टर

  • यवतमाळ : सोयाबीन - 250 हेक्टर तर कापूस 200 हेक्टर

  • वर्धा : सोयाबीन - 650 हेक्टर तर कापूस - 130हेक्टर

  • अमरावती : सोयाबीन 245 हेक्टर तर कापूस - 75 हेक्टर


आकडेवारीनुसार, बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त सोयाबिन येलो मोझक व्हायरसनं उध्वस्त झालं आहे. असं असतानाही जिल्ह्यातील नुकसानीचा सर्व्हे करण्याचे आदेश शासनानं दिलेले नसल्यानं आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आता रविकांत तुपकर यांनी सरकारला पत्र लिहून बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. आगामी काळात नेते आणि मंत्र्यांना जिल्ह्याजिल्ह्यात फिरण्यास विरोध करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


विदर्भातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यानंतर आता कपाशी उत्पादक शेतकरी देखील संकटात पडला आहे. सोयाबीन पिकावर येलो मोझॅक आणि खोड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतानाच कपाशी पिकावर देखील आता पॅराविल्ट अर्थात मर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं कपाशीचं उभं पिक जळत आहे. खरीप हंगामातील इतर पिकं हातातून गेल्यानंतर कपाशी पिकांवर शेतकऱ्यांना मोठी आशा होती, मात्र हातचं पीक निघून जात असल्यानं शेतकरी हवालदिल झाल्याचं दुर्दैवी दृश्य पाहायला मिळत आहे.