Chitra Wagh on Supriya Sule : सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज माढा (Madha) आणि सोलापूर (Solapur) लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी (NCP Crisis) फुटीवरुन सुप्रिया सुळे यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली. 105 आमदार निवडून आणलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपद देत भाजपनं अन्याय केला, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही तुमची आणि तुमच्या बुडणाऱ्या पक्षाची काळजी करा. आमची काळजी करू नका, असं म्हणत चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर सडकून टीका केली आहे.  दरम्यान, भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या वतीनं मागील महिनाभरापासून भंडारा आणि गोंदिया या लोकसभा क्षेत्रात वैनगंगा-पांगोली सांस्कृतिक महत्त्वाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या भंडाऱ्याच्या साकोली इथं आल्या होत्या. यावेळी त्यांना राज्यातील विविध राजकीय विषयांवर माध्यमांनी प्रश्न विचारले, यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 


तुम्ही तुमची आणि तुमच्या बुडणाऱ्या पक्षाची काळजी करा, आमची काळजी करू नका : चित्रा वाघ 


"तुम्ही काळजी करू नका ताई. तुम्ही तुमची आणि तुमच्या बुडणाऱ्या पक्षाची काळजी करा. आमची काळजी करू नका, आमचे देवेंद्रजी आणि त्यांच्या मागे महाराष्ट्राच्या जनतेचा जनाधार आहेत. आमचे नेते हे लोकांच्या मनामध्ये आहेत. लोकांनी मानलंय त्यांना, म्हणून त्यांना लोकांनी निवडूनसुद्धा दिलं. आजच्या तारखेलासुद्धा महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार कुणाच्या नेतृत्वात आले, तर ते देवेंद्रजी आणि भाजपाच्या नेतृत्वात आले. म्हणून आम्ही सर्व ज्ञानींना जो सल्ला देतो, तोच तुम्हाला आम्ही सांगतोय आज, तुम्ही आपलं बुडतं जहाज बघा, आपलं जे काही उरलंय ते सांभाळा, नाहीतर असं होईल आमच्यावर टीका करायच्या नादात जे उरलेत तेसुद्धा आमच्याकडे येतील, याची काळजी घ्या. अशा प्रकारची प्रखर टीका चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली. 


मोठ्या ताई सतत दोन दिवसांपासून टिव-टिव करत आहेत; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका


भाजपवर चांगले दिवस आले, तरी कार्यकर्त्यांना चटई उचलायची वेळ अशा प्रकारची टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली होती त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मोठ्या ताई आहेत आणि मोठ्या ताई गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत टिवटिव करत आहेत. आम्ही ते पाहतोय... याच भंडाऱ्यात अग्निकांड झालं होतं. 11 कोवळी मुलं जळून खाक झाली होती. तेव्हा या ताई कुठ होत्या? तुमचं सरकार होतं, त्यावेळी तेव्हा त्या कुठं होत्या? त्यामुळं मला त्यांना सांगायचं आहे. मोठ्या ताई... आपले दिवस आठवा अडीच वर्षात फक्त सत्ता उपभोगलीत तुम्ही. अरे... लाज वाटली पाहिजे तुम्हाला. महिला आणि मुलींच्या रक्षणासाठी असणाऱ्या निर्भया कायद्याला तुम्ही विरोध करता, असं टीकास्त्र चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर डागलं आहे. 


तुमच्या सरकारनं जी वचनं दिली ती वचन आमचं सरकार आणि देवेंद्रजीनीं पूर्ण केलीत : चित्रा वाघ 


यशोमती ठाकूर यांनी बोलताना भाजप आणि नथुराम गोडसे यांचा DNA एकच, अशी टीका केली होती. त्यावरुन चित्रा वाघ यांनी टीकास्त्र डागलं आहे. "विरोधी पक्ष हा चक्करमध्ये पडलेला आहे आणि फर्स्टेशनमुळे यांचे नेते अशा भूमिका यांचे नेते मांडताना दिसतात आहेत. आज बेछूटपणे भाजपवर बोलताना दिसतायत. त्यांना काय विरोधकांना जे बोलायचं ते बोलू द्या, त्यानं आम्हाला काहीच फरक पडत नाही. लोकांना काही फरक पडत नाही. कारण लोकांसाठी असणारी जी कामं आहेत, लोकांसाठी मोदींनी केलेली कामं, लोकांसाठी केलेलं महायुती सरकारचं कामं हे त्या ठिकाणी जोमानं चाललं आहे. मला यशोमती ताईंना आठवण करून द्यायची आहे, आपण महिला बाल कल्याण मंत्री होतात, त्यावेळेला हिंगणघाटच्या एका मुलीला जिवंत जाळण्यात आलं. मोठी मोठी भाषण झोडलीत हो तुम्ही, त्या घटनेनंतर आपल्या राज्यामध्ये शक्ती कायदा येणार होता. अडीच वर्ष सत्ता उपभोगली तुम्ही. पण, त्या मुलीला विसरलात, तिच्या परिवाराला विसरलात. कलेक्टरकडून लिहून दिलेलं म्हणजेचं, सरकारकडून लिहून दिलेलं वचनसुद्धा तुम्ही पाळू शकला नाहीत. तुम्हाला तर या सर्व गोष्टींवर बोलायचा नैतिक अधिकारच नाही. महिला म्हणून तुम्ही त्या ठिकाणी होतात, तुमची भूमिका काय होती? ज्या वेळेला रस्त्यावरती महाराष्ट्र आला, त्यावेळी मगरीचे अश्रू घेऊन तुम्ही सगळे आले. आज मला सांगताना समाधान वाटतंय गेलेली मुलगी आम्ही परत आणून देऊ शकलो नाही. पण तुम्ही जे केलं ना... तुमच्या सरकारनं जी वचनं दिली. ती वचनं आमच्या देवेंद्रजीनीं पूर्ण केली आहेत. असे वचनाला जागणारे आणि लोकांसाठी भक्कमपणे ठाम उभे राहणारे, असे आमचे नेते आहेत. त्यामुळं तुम्ही काय बोलता, याला महाराष्ट्रात फारसं महत्त्व नाही, असा पलटवार चित्रा वाघ यांनी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर केला. 


पाहा व्हिडीओ : Chitra Wagh on Supriya Sule : तुम्ही तुमची आणि तुमच्या बुडणाऱ्या पक्षाची काळजी करा, आमची करू नका