Weather Update Today : आज देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Moonson Withdrawl) इशारा देण्यात आला आहे. राज्यासह देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. देशातील पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. येत्या काही दिवसांत देशातून मान्सून पूर्णपणे माघारा घेईल. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, आज देशाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उर्वरित भागात हवामान निरभ्र राहील.


पुढील 48 तासांत परतीच्या पावसाची हजेरी


बिहार, झारखंड, मध्य प्रदेशसह काही राज्यांमध्ये परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार, पुढील 48 तासांत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिसा, कर्नाटक, तामिळनाडूसह महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल. पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, दक्षिण-पश्चिम मान्सूनची पूर्णपणे माघार घेईल.






देशाच्या विविध भागात परतीच्या पावसाची हजेरी


तामिळनाडूसह कर्नाटकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नैऋत्य मान्सून माघारी फिरत असल्याने बिहारसह मध्य प्रदेशात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण आतील कर्नाटकात 9 आणि 10 ऑक्टोबरला परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तसेच, केरळमध्ये 10 आणि 11 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


मुंबई, दिल्लीत ढगाळ वातावरण


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीमध्ये आज हवामान स्वच्छ राहील. मुंबईमध्ये सध्या तापमान वाढलं आहे. ऑक्टोबर महिन्यात मुंबईकरांना उष्णतेची झळ बसणार आहे. दिल्लीत 10 ऑक्टोबरपासून पावसाची शक्यता आहे. किमान तापमान 22 अंश, तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये सोमवारी आणि मंगळवारी अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 


सिक्किममध्ये पूरस्थिती


सिक्किममध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिक्कीममधील महापुरानंतर तेथे अडकलेल्या पर्यटक, कामगार आणि स्थानिकांचं मदत आणि बचावकार्य सुरू आहे. रविवारी रस्ते संपर्क नसलेल्या भागातून एकूण 206 जणांची सुटका करण्यात आली. राज्य प्रशासनाकडे रविवारपर्यंत दाखल झालेल्या अहवालानुसार, बेपत्ता लोकांची संख्या 105 वर पोहोचली आहे. खराब हवामानामुळे हवाई दलाची हेलिकॉप्टर टेक ऑफ करू शकत नाही, त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Weather : तापमान वाढणार, ऑक्टोबरमध्ये 'चटका' बसणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज