मुंबई: गिरीजा कीर यांच्या चंद्रलिंपी, चक्रवेध, स्वप्नात चंद्र ज्याच्या, आभाळमाया, आत्मभान, गिरीजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, झपाटलेला अशा अनेक कांदंबऱ्यांना मोठी वाचकप्रियता लाभली. त्यांनी आतापर्यंत ११५ पुस्तके लिहिली आहेत. कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णनं अशा विविध वाड:मय प्रकारात त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली.  व्यक्तिचित्रणातही गिरीजा कीर यांच्या वेगळ्या शैलीचा परिचय येतो. गाभाऱ्यातील माणसं, जगावेगळी माणसं, कलावंत, साहित्य सहवास ही त्यांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके समीक्षकांच्या पसंतीस उतरली. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गिरीजा कीर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार', पुणे मराठी ग्रंथालयाचा कमलाबाई टिळक पुरस्कार, अभिरूची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन स्त्री साहित्यिक पुरस्कार आदी सन्मानांनी गौरविण्यात आले होते.

बालसाहित्याचीही त्यांनी विपुल निर्मिती केली. झंप्या द ग्रेट!, फुलं फुलवणारा म्हातारा, चला, उठा, जागे व्हा, शाब्बास, पुंडी शाब्बास! अशी लहानमुलांसाठीची पुस्तकंही त्यांनी लिहिली. कैद्यांचं आयुष्य, त्यांचा तुरूंगावास यांचं चित्रण करणारं त्यांचं 'जन्मठेप' हे पुस्तक अलिकडेच प्रसिद्ध झालं होतं. या पुस्तकाकरिता त्यांनी येरवडा कारागृहातील कैद्यांवर ६ वर्ष संशोधन केलं होतं.

१९६८ ते १९७८ या काळात त्या 'अनुराधा' मासिकाच्या सहाय्यक संपादिका होत्या. सामाजिक समस्यांची जाण यावी यासाठी त्यांनी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन अभ्यास केला. त्यांच्या साहित्यात या जीवनानुभवाचं प्रतिबिंब दिसतं.

ठाणे येथे आयोजित झालेल्या ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी निवडणूक लढवली होती.

त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सायन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.