मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या बुधवारी 6 नोव्हेंबरला मराठवाड्याचा पाहणी दौरा करणार आहेत. यावेळी परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. शरद पवारांसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील असणार आहेत. यावर्षी परतीच्या पावसामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.


या दौर्‍यात शरद पवार परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. सर्वप्रथम परभणीतील सेलू तालुक्यातील काही भागांची त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत भागात नुकसानीची पाहणी ते करणार आहेत.


परतीच्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मराठवाड्यात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, बाजरीचं मोठं नुकसान झालं आहे. हाताला आलेली पिके काढण्याचे दिवस होते आणि तोच पावसाने जोरदार हजेरी लावली.


विदर्भातील खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांचंही मोठे नुकसान झालं आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे सोयाबीनसह तूर, हरभरा, ज्वारी, कापूस या रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर डाळींब, पपई, या फळबाग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये द्राक्ष बागांचंही मोठं नुकसान झालं आहे.


हिंगोलीत काळे झेंडे तर औरंगाबादेत मोर्चा


हिंगोली परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान झालेलं असताना कृषी विभागाचे आणि महसूल विभागाचे अधिकारी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी फिरकले नाहीत. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावांमधील संतप्त शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर काळे झेंडे लावून प्रशासनाचा निषेध केला आहे. याहूनही अधिक तीव्र आंदोलन भविष्यात केलं जाईल, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आज शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी नुकसान झालेले पीक हातात घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.