Vijay Kadam : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज (10 ऑगस्ट) पहाटे निधन झाले. विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखला जात होते. त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. अभिनेते विजय कदम गेल्या दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांची झुंज अपयशी ठरली.अभिनेते विजय कदम यांच्या पार्थिवावर आज रात्री उशिरा अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दु:खद बातमीनंतर मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.


'विच्छा माझी पुरी करा'ने घराघरात पोहोचले


विजय कदम यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला थिएटरमधून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले. 'विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्या', 'खुमखुमी' हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. 1986 पासून आतापर्यंत विजय कदम यांनी 750 हून जास्त प्रयोग केले. विजय कदम यांनी अनेक वर्षे त्यांच्या ‘विजयश्री’ या संस्थेकडून ‘खुमखुमी’हा एकपात्री प्रयोग केला. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये विजय कदम घराघरात पोहोचले. 


अनेक मराठी चित्रपटात भूमिका


राजानं वाजवला बाजा, आनंदी आनंद, इरसाल कार्टी, लावू का लाथ, गोळाबेरीज, ऑन ड्युटी २४ तास, वासुदेव बळवंत फडके, रेवती, देखणी बायको नाम्याची, मेनका उर्वशी, कोकणस्थ आदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. सही रे सही, टुरटूर, पप्पा सांगा कुणाचे ही देखील त्यांनी गाजलेली नाटके आहेत. विजय कदम यांनी 1980 च्या दशकात चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करून प्रेक्षकांची खूप प्रशंसा मिळवली. त्यांचे 'चश्में बहादूर', 'पोलिसलाइन', 'हळदे रुसली कुंकू हसलं' आणि 'आम्ही दोघं राजा राणी' हे चित्रपट खूप गाजले. विजय कदम विनोदी भूमिकांसाठी जितके लोकप्रिय होते तितकेच ते गंभीर भूमिकांसाठीही लोकप्रिय होते. त्यामुळेच त्यांना अष्टपैलू प्रतिभेचा अभिनेता असेही म्हटले जात असे. 


इतर महत्वाच्या बातम्या