पंढरपूर : पांडुरंगाच्या दर्शनाची आषाढी वारीमध्ये भाविकांची गर्दी होऊ नये आणि गर्दी झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल असे कारण सांगून सरकारने मंदिर बंद ठेवले आहे. पण जर शेगाव दर्शन पॅटर्न हा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू करावा व भाविकांना ऑनलाईन पद्धतीने पास देऊन दर्शन द्यावे आज सरकारने विचार केला तर पूर्ण महिन्यात कमीत कमी एक लाख पन्नास हजार भाविक दर्शन घेऊ शकतील त्यामुळे पंढरपूर येथे शेगाव दर्शन पॅटर्न राबविण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी केली आहे.
काय आहे शेगाव दर्शन पॅटर्न...?
गेल्या अनलॉक वेळी मंदिरे तीन महिने उघडल्या गेली होती त्यावेळी शेगाव येथील गजानन महाराज संस्थान मध्ये एका दिवसात साडेपाच हजार भाविकांना कोरोना चे सर्व नियम पाळून दर्शन दिल्या जात होते . आधी ऑनलाइन पास काढून मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या दिवशी आणि मिळालेल्या वेळेतच मंदिरात प्रवेश मिळत होता. आणि ही प्रक्रिया सर्व ऑनलाईन असल्यामुळे ज्या भाविकांचा दर्शनाचा नंबर आहे तो भावीक त्या तारखेला ठरावीक वेळेवर तिथे उपस्थित राहत होता. त्यामुळे ना गर्दी ना गोंधळ....एका तासात 500 भाविकांना मंदिरात प्रवेश मिळत होता असे दिवसातून 11 स्लॉट मध्ये दररोज 5500 भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत होता . असाच पेटर्न पुढील महिनाभर पंढरपूर येथे लागू करावा अशी मागणी ह भ प थेटे महाराज यांची आहे.
जर पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीने ठरविले आपल्याला शेगाव पॅटर्न राबवून भाविकांना दर्शन द्यायचे आहे आणि सरकारने जर पुढाकार घेऊन होकार दिला तर एका दिवसाला साडे पाच हजार भाविक म्हणजे तीस दिवसांमध्ये एक लाख पन्नास हजार भाविक कुठल्याही प्रकारचा गळबळ गोंधळ न होता कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन घेऊ शकतात आणि या नियोजनाने पंढरपूर मध्ये गर्दी होणार नाही दररोज तीन हजार 'भाविक जर पंढरपूर मध्ये दर्शनाला आले तर जे छोटे-मोठे व्यवसायिक आहेत त्यांनाही उपजीविकेचे साधन प्राप्त होईल कारण की पंढरपूर येथील व्यवसायिक मंडळींचा उदरनिर्वाह हा यात्रेकरू मंडळींच्या भरवशावर आहेत व्यवसायिक मंडळींनाही वाटतं पंढरपूर मध्ये वारकरी आले पाहिजे.
गेल्या दोन वर्षापासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्यामुळे देवस्थानला फार मोठी आर्थिक झळ पोहोचलेली आहे. जर भाविक दररोज पांडुरंगाच्या दर्शनाला येत राहिले तर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानला आर्थिक स्वरूपात फार मोठी मदत होऊ शकते. कोरोना कालखंडामध्ये विठ्ठल रुक्मिणी समितीने कोरोनाशी निगडीत सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे. त्यामध्ये क्वारंटाईन सेंटर, ऑक्सीजन सिलेंडर, माक्स, सॅनिटायझर किंवा आर्थिक स्वरूपात सर्वतोपरी मदत केली आहे. जे भाविक पंढरपूर मध्ये येतील त्यांच्याजवळ कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असेल तरच पंढरपूर परिसरात प्रवेश दयावा.