Vasai Bus Fire : वसई पश्चिमेच्या मुख्य रस्त्यावर पालिकेच्या बसला (Bus Fire) आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री 8:45 च्या सुमारास चालू बस मधून अचानक धूर निघाल्याने बस मधील प्रवाशी भयभीत झाले होते. त्वरित प्रसंगावधान राखत बस चालक आणि कंडक्टरने बसमधील प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.


 


बसचे मोठे नुकसान, आगीच कारण समोर 


बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसचे मोठे नुकसान झाले आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवान तसेच तिथल्या स्थानिकांनी पाणी टाकून आगीचा भडका होण्याआधीच आग आटोक्यात आणली. पालिकेच्या परिवहन बस दुरुस्ती न करता रस्त्यावर चालत असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचं नागरिक सांगत आहेत. वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने बसचे मेंटेनेस, दुरुस्ती वेळेवर करावे अन्यथा अशा बसमुळे प्रवाश्यांच्या जीवास मोठा फटका बसू शकतो. अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.


 



गुरूवारी वसईत भीषण अपघात


शुक्रवारी बसला आग लागल्याची घटना घडली, तर गुरूवारी वसई पश्चिमेच्या बाभोला परिसरात रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. मोटरसायकल आणि चार चाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेमध्ये मोटर सायकलस्वार गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत कुटीनो हा जिम मधून आपल्या घरी दुचाकीवर वसईला जात होता. दरम्यान त्याच ठिकाणाहून समोरून चार चाकी गाडी ही वसई स्टेशनच्या दिशेने येत होती. दोघांची समोरासमोर धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं आहे. कारचे  एअरबॅग उघडल्याने कार मधील वाहनचालकाला काही झालं नाही. मात्र यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने येथे अपघात होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.


 


हेही वाचा>>


Vasai Accident : वसईच्या बाभोला परिसरात भीषण अपघात, मोटरसायकल-कारची समोरासमोर धडक, एक गंभीर जखमी