Chiplun : चिपळूणमध्ये माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या गाडीवर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यालयासमोर काल दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळूणात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं, राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना काल भिडले होते. चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या


काल चिपळूणमध्ये भाजपचे नेते निलेश राणे यांच्या गुहागर येथील सभेपूर्वी ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली. भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर हा सर्व प्रकार घडला. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्याने या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. दरम्यान, निलेश राणे याठिकाणी आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्याला भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि राड्याला सुरुवात झाली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या दिशेने दगड फेकले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना दूर पळवून लावले. मात्र, यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या.


 


अचानक दगडफेक झाली आणि एकच गोंधळ उडाला


आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दोऱ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. यावर निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर देत टीका केली. त्यामुळे आपण त्यांच्या मतदार संघातच सभा घेऊ आणि तेथेच बोलू, असे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता गुहागर येथील शृंगारतळी या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी निलेश राणे गुहागरकडे जाण्यासाठी निघाले होते. साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान राणे यांच्या गाडीसह सर्व ताफा आमदार जाधव यांच्या चिपळुणातील कार्यालयासमोरुन जात असताना अचानक त्यांच्या गाडीवर अचानक दगडफेक झाली आणि एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे समोर आले. मोठा जमाव जमताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीत तसेच धावपळीत सात ते आठ कार्यकर्ते जखमी झाल्याचे समजते


 


 


हेही वाचा>>>


Nilesh Rane: दगडफेक होताच निलेश राणे तावातावाने गाडीतून उतरले, चिपळूणमध्ये भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर नेमकं काय घडलं?